मुंबईत दुसर्‍या टप्प्यात 6 हजार सीसीटीव्ही बसविणार

मुंबईत दुसर्‍या टप्प्यात 6 हजार सीसीटीव्ही बसविणार

मुंबईत पहिल्या टप्प्यात 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात 6 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. राज्यात ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येत असून गृह विभागासह ग्रामविकास आणि नगरविकास विभागाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही वळसे- पाटील यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सी ६० मधील पोलीस कर्मचार्‍यांना इतर पोलिसांपेक्षा दुप्पट भत्ते देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत सन २०२१-२२ या वर्षाच्या गृह, सार्वजनिक आरोग्य तसेच सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वळसे- पाटील यांनी येत्या मार्च महिन्यापर्यंत राज्यातील ८७ पोलीस ठाण्यांच्या इमारतींची कामे हातात घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

रौलेट गेमवर बंदी घालण्यासाठी सध्या सक्षम कायदा नाही. तरीही अशा गेममुळे राज्याच्या महसुलाचे नुकसान होत असेल तर अशा गेमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

वेबसिरीजमधील देहप्रदर्शन रोखण्यासाठी कारवाई
वेबसिरीजच्या मालिकांमध्ये दाखवले जाणारे महिलांचे देहप्रदर्शन रोखण्यासाठी कारवाई महाराष्ट्र पोलिसांकडून सुरू आहे. तक्रार आल्यानंतर सायबर सेल विभागाकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे तक्रार करून सर्व्हरवरून कार्यक्रम ब्लॉक करण्याची विनंती केली जाते. मात्र, त्यासाठी तक्रारी झाल्या तर पोलिसांना अधिक चांगली कारवाई करता येईल, असे वळसे- पाटील म्हणाले.

First Published on: March 9, 2022 5:45 AM
Exit mobile version