होमगार्ड तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

होमगार्ड तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

होमगार्ड (गृहरक्षक) दलातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपायाविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यातच अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नितीन पवार असे पोलीस शिपायाचे नाव असून तो मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नितीन पवार हा विवाहित असून काही वर्षांपूर्वी त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झालेला आहे. २०१६ मध्ये नितीन पवार यांची होमगार्ड (गृहरक्षक) दलात काम करणार्‍या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन पोलीस शिपाई पवार याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. महत्वाचे म्हणजे त्याने आपण घटस्फोटीत असल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले होते. मागील काही महिन्यांपासून तरुणीने पोलीस शिपाई पवार याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता, मात्र प्रत्येक वेळी काहीना काही कारण पुढे तो तीला टाळत होता. तसेच नितीन पवार हा घटस्फोटीत आहे हे तिला कळल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली. नितीन पवार याने आपली फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले असता तीने या प्रकरणी नितीन पवार याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रार अर्जावरून अखेर पोलीस शिपाई नितीन पवार याच्या विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास पोनि. सुधीर गडकर हे करीत आहे. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी ‘आपलं महानगर’ सोबत बोलताना सांगितले.

First Published on: November 13, 2018 1:30 AM
Exit mobile version