कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचा अहवाल मिळण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांकडे दिल्याचा प्रकार कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात घडला होता. आता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराची पालिका आयुक्त डॉ. विजय सिंघल यांनी दखल घेऊन रूग्णालयातील प्रशासन प्रमुखांना कारणे दाखवा नेाटीस बजावली आहे. एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आला होता.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणारा हा ५५ वर्षीय व्यक्तीला श्वसनास त्रास होत असल्याने पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल केले होते त्या व्यक्तीची करोना तपासणी करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हेाता. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच रूग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.
मात्र त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीवर अंत्यसंस्कार पार पडले असून अंत्ययात्रेत अनेकजण सहभागी झाल्याचे बोलले जाते. रूग्णालय प्रशासनाकडून अशी चूक तिसऱ्यांदा झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्त सिंघल यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन रूग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रशासन काय स्पष्टीकरण देते याकडे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्हयात करोनाबाधित रूग्णांचीसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच मंगळवारी जिल्हयात सर्वाधिक ११५ रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्हयात करोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजार ३९७ वर पोहचली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ठाण्यात मंगळवारी एकाच दिवशी १६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णांना मध्ये एक ९० वर्षांच्या आजींचा तसेच ५ वर्षांखालील ३ बालकांचा तसेच एका छोट्या बाळाचाही समावेश आहे.
First Published on: May 5, 2020 9:23 PM
Exit mobile version