रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, वाहनांतून उभ्याने करावा लागतोय प्रवास

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, वाहनांतून उभ्याने करावा लागतोय प्रवास

केईएम हॉस्पिटल

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांची गर्दी कमी करण्यासाठी संपूर्ण मुंबई लॉकडाऊन करण्यात आली असली, तरी एसटी आणि बेस्टच्या बसेसमधून तसेच सेवेत घेतलेल्या खासगी बसेसमधून उभ्याने प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी असलेल्या बसेसमधून लोकांना उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एकप्रकारे रुग्णालयांच्या माध्यमातूनच शासनाच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याची बाब समोर येत आहे.

हेही वाचा – करोना : आता ‘अल्लाह की मर्झी, गोडो आम्हाला वाचवेल

कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे उभ्याने प्रवास

संपूर्ण मुंबईसह राज्यातील सर्व दुकाने आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी बेस्ट बसेस, एसटी महामंडळाच्या बसेच तसेच महापालिकेची वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कस्तुरबा, केईएम, शीव, नायर आदींसह प्रमुख रुग्णालये आणि सफाई कामगारांसाठी प्रत्येक वॉर्डमधून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या बसेसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पुरुषांसह महिला प्रवाशांनाही उभ्याने प्रवास करावा लागत आहे.

एकाबाजूला देशाचे पंतप्रधान सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर आवश्यक असताना, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बसेसमध्ये गर्दीतून होणारा प्रवास हा अपवाद ठरत आहे. किंबहुना सरकारच्या आदेशाला हरताळ फासणारा आहे. त्यामुळे भविष्यात या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) रमेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. तरीही संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि अधिक्षक आदींना याची कल्पना देवून लक्ष देण्याच्या सूचना केल्या जातील, असे सांगितले.

First Published on: March 26, 2020 6:52 PM
Exit mobile version