सामान्य गृहिणी ते मिसेस महाराष्ट्र…निहारिका सदाफुले!

सामान्य गृहिणी ते मिसेस महाराष्ट्र…निहारिका सदाफुले!

Mrs India Maharashtra Niharika Sadafule

गृहिणी म्हटले की, तिची एक काकूबाई म्हणून प्रतिमा असते. तिला बाहेरच्या आधुनिक जगाची फारशी माहिती नसते, त्या मॉडर्न जगाचे फण्डे तिला अवगत नसतात, तिला सौंदर्याच्या नव्या व्याख्यांची कल्पना नसते; पण या सगळ्या समजांच्या चिरफळ्या उडवत ‘मिसेस महाराष्ट्र’ हा सौंदर्य स्पर्धेतील किताब पटकावला. चाळीशी पार झाली की, आता आपली उमेद संपली असं मानलं जातं, पण वयाची ४४ वर्षे झाल्यावरही सदाफुले आपल्यातील नव्या उर्मी फुलवत राहिल्या. त्यामुळेच त्यांना सौंदर्य स्पर्धेत विजयी होऊन अनेक गृहिणींसाठी प्रेरणास्थान बनता आले.

निहारिका नोकरी करत होत्या. पण २०१२ पासून कुटुंबाची गरज लक्षात घेऊन त्यांनी नोकरी सोडली. त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्यांचा थेट संपर्क खूपच कमी झाला. त्यामुळे आपण आणि आपले घर असेच त्यांचे एकचाली जीवन सुरू होते. २०१८ साली मिसेस इंडिया पीजीयंट्स अ‍ॅण्ड प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडून घेण्यात येणार्‍या स्पर्धेची त्यांंना अनपेक्षितपणे माहिती मिळाली. त्यातूनच ‘सामान्य गृहिणी ते मिसेस महाराष्ट्र’ असा प्रवास निहारिका सदाफुले यांनी केला. याआधी कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेला नव्हता. आपल्या या यशामागे वडील, पती, मुलगा यांनी आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देऊन सहकार्य केले, असे निहारिका यांनी सांगितले आहे.

सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याचा त्यांनी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता. त्या एका इंग्लिश शाळेत उपमुख्याध्यापिका होत्या. घरात वयोवृद्ध सासरे होते. ते आजारी असल्याने त्यांची सेवा करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. २०१२ पासून त्या गृहिणीच आहेत. फेसबुकवर त्यांना एक दिवस मिसेस इंडिया स्पर्धेची माहिती मिळाली. त्यांनी सहज गंमत म्हणून स्पर्धेचा अर्ज भरला. तिथून दूरध्वनीवरून मुलाखती झाल्या. सुरुवातीला ही स्पर्धा बोगस आहे, असा त्यांना संशय आला. मग त्यांचे पती निशिकांत यांनी चौकशी केली. खात्री केल्यावर त्यांनी स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. याआधी त्यांनी कधीही एकट्याने दूरचा प्रवास केला नव्हता. तरी त्यांनी मनाचा हिय्या केला आणि त्या चेन्नईला गेल्या.

सुरुवातीला त्या घाबरल्या. पुढे फाईव्ह स्टार हॉटेल आणि तिथे स्पर्धेसाठी आलेल्या महिला पाहून त्यांना आपणही काही करू शकतो, असे वाटू लागले. अनेक महिला आठ ते नऊ सुटकेस घेऊन आल्या होत्या आणि निहारिका यांनी केवळ एक बॅग आणली होती. त्या महिलांना सौंदर्य स्पर्धांचा अनुभव होता. तर निहारिका यांना काहीच कल्पना नव्हती. पण तरीही त्यांच्याकडे जिद्द होती. त्या जोरावर त्यांनी यश मिळवले. वडील शंकर रवीढोणे सहाय्यक पोलीस आयुक्त होते. त्यामुळे त्यांंना मानसिक बळ मिळाले. निहारिका सात दिवस चेन्नईलाच राहिल्या. इतर महिला आणि प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवत गेल्या. दररोज विविध प्रकारच्या स्पर्धा होत असत. टाइम मॅनेजमेट, वागावे कसे हे त्यांना शिकायला मिळाले. सौंदर्य स्पर्धेविषयी अनेकांचे गैरसमज आहेत. सुंदर म्हणजे निर्बुद्ध असे मानले जाते. पण तसे नसते. तिथे सौंदर्यापेक्षा हुशारीला महत्त्व असते. २० टक्के सौंदर्य आणि ८० टक्के हुशारी लागते, असे निहारिका म्हणाल्या. या स्पर्धेत मिसेस महाराष्ट्र म्हणून मी विजयी झाले. स्पर्धेसाठी ३० हजार नावे पुढे आली होती. त्यातून ७२ जणींची निवड झाली. स्पर्धा खूप कठीण होती. परंतु, बीएडचे शिक्षण, इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे निहारिका यांनी बाजी मारली.

मला पुन्हा मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तसेच सामाजिक संस्थेसोबत समाजोपयोगी काम करायचे आहे. एक शेतकरी कुटुंब दत्तक घ्यायचे आहे. या स्पर्धेने मला स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे.  – निहारिका सदाफुले

First Published on: August 12, 2018 6:30 AM
Exit mobile version