Suez Canal : मुंबईचा वेश्याव्यवसाय सुएझ कालव्याच्या कनेक्टिव्हिटीने कसा बदलला ?

Suez Canal : मुंबईचा वेश्याव्यवसाय सुएझ कालव्याच्या कनेक्टिव्हिटीने कसा बदलला ?

जगभरात २३ मार्चपासून ४०० मीटर रूंद अशा सुएझ कॅनलमध्ये अडकलेल्या शिपिंग कंटेनर एव्हर गिव्हनची चर्चा सुरू आहे. सुएझ कालव्याचे महत्व जागतिक व्यापाऱ्याच्या निमित्ताने कसे आहे, याचीच चर्चा या एव्हर गिव्हनच्या ब्लॉकच्या निमित्ताने झाली. पण या अपघातामुळे सुएझ कालव्यातील १५० वर्षांपूर्वींचा एक प्रसंग पुढे आला आहे. सुएझ कालव्याच्या निमित्ताने मुंबई शहराला कशा पद्धतीने एक नवीन आकार आणि ओळख मिळाली याचीच सुरूवात त्या १५० वर्षांपूर्वीच्या घटनेने झाली होती. पश्चिम किनारपट्टीवर सर्वात विकसित असे बंदर म्हणून मुंबई बंदराची नवी ओळख निर्माण झाल्यानंतर युरोपातील जहाजांसाठी पसंतीचे बंदर म्हणून मुंबई बंदराच्या निमित्ताने गेटवे ऑफ इंडियाचा विकास होत गेला. त्यासोबतच भारतात रेल्वेचे जाळे विकसित होत असताना देशातील अनेक मेट्रो शहरांचे जाळे मुंबईपासून विकसित होत होते. पण व्यापाऱ्याच्या युरोप भारताच्या संबंधांसोबतच भारताचा संपर्क हा जागतिक सेक्स ट्रेडमध्ये आणण्यासाठी सुएझ कालव्याची कनेक्टिव्हिटी ही महत्वाची होती. भारतातील शहरांमध्ये युरोपियन वेश्या महिला पोहचण्यासाठी सुएझ कालवा हाच एकमेव दुवा होता याबाबतचे अनेक संदर्भ हे स्क्रोल या संकेतस्थळावरील एका लेखाच्या निमित्ताने समोर आले आहेत.

काय होती १५० वर्षांपूर्वीची घटना ?

इजिप्तने २७ नोव्हेंबर १८६९ रोजी सुएझ कालव्याचे उद्घाटन केल्यानंतर भारताच्या दिशेने जाणाऱ्या एका जहाजाला पहिल्याच जहाजाला मोठा अपघात झाला. भारतात वाईनचा कार्गो घेऊन येणारे नोएल जहाज हे रेड सी मध्ये बुडाल्याची घटना बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्राने बातमीच्या स्वरूपात दिली होती. पण या घटनेच्या भारताच्या कनेक्टिव्हिटीवर फार काळ मोठा परिणाम राहीला नाही. सुएझ कालव्यामुळे युरोप आणि भारता दरम्यानचा प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी झाला. इंग्लंडमार्गे उपखंडात येण्यासाठीचा तीन महिन्यांचा कालावधी हा चार ते पाच आठवड्यावर येण्यासाठीचा दुवा सुएझ कालवा होता. त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या मार्गेच युरोपातून भारतात येण्यासाठीचा मार्ग होता. या कालव्यामुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत झाली.

मुंबईतला देहविक्रीय व्यवसाय कसा बदलला ?

सुएझच्या कॅनलमुळेच भारतीय उत्पादने ही अतिशय वेगाने परदेशातील बाजारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. खरेदी तसेच विक्रीसाठीचा व्यवसाय हा करारान्वये तसेच कंत्राटानुसार होऊ लागला, असा उल्लेख बॉम्बे चेंबर्स एण्ड कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीने केलेला आहे. मालवाहतुकीसाठी वेगवान अशा पद्धतीचा मार्ग यामुळेच पूर्व आणि पश्चिमी व्यापारासाठी संधी उपलब्ध होतानाच बॅंकिंग, कॉमर्स आणि शिपिंगसाठीचे अधिक पर्याय हे समीकरण निश्चित झाले. ज्या पद्धतीने मालवाहतूकीसाठीचा व्यवसाय वेगवान आणि सुलभ झाला, त्यानुसारच मुंबईसाठी आणखी एक गोष्ट बदलली ती म्हणजे मुंबईतील देहविक्रीय व्यवसाय.

१८६९ मध्ये सुएझ कॅनल व्यापारासाठी खुला होण्यापूर्वी पूर्व युरोपातील परदेशी वेश्या ही भारतीयांना तशी परिचयाची नव्हती. युरेशियन किंवा भारतातील महिलांनाच वेश्या असे संबोधले जात होते. १९२९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या द बॉम्बे सिटी पोलिसमध्ये सनदी अधिकारी असलेल्या एस एम एडवर्ड्स यांच्या पुस्तकातूनच मुंबईतील वेश्याव्यवसायाचा संदर्भ आहे. पण जेव्हापासून युरोपियन जहाज कंपन्यांचा भारतीयांशी व्यापाराच्या निमित्ताने नियमित संवाद होऊ लागला तेव्हापासूनच भारत देश हा जागतिक पातळीवर सेक्स ट्रेड (व्यवसायात) सामील झाला असाही दाखला त्यांच्या पुस्तकात आहे.

भारतात एकट्या आणि मर्जीनुसारच आल्या युरोपियन वेश्या

ज्या परदेशी महिला मुंबईत वेश्याव्यवसायासाठी यायच्या त्या एकट्या आणि स्वतःच्या मर्जीने यायला सुरूवात झाली होती. त्यावेळच्या बॉम्बे बंदरावर विविध वयोगटाच्या महिला पाऊल ठेवण्याची सुरूवात यानिमित्ताने झाली होती असा दाखला एडवर्ड्स यांच्या पुस्तकात देण्यात आला आहे. या परदेशी महिलांना मुंबईतल्या कुंटणखान्यातील प्रमुखाकडूनच राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जायची. त्यासाठी या परदेशी महिलांच्या रोजच्या कमाईतून ५० टक्के रक्कम कापली जायची. १९ व्या शतकाच्या शेवटी मुंबईपासून ते भारतातील विविध शहरांमध्ये सर्वाधिक अशा युरोपियन वेश्या पोहचल्याचा दाखला हा अश्विनी तांबे या लेखिकेच्या पुस्तकात आहे. कोड्स ऑफ मिसकंडक्ट, रेग्युलेटिंग प्रॉस्टिट्यूट इन लेट कोलोनियल बॉम्बे पुस्तकात त्यांनी हा संदर्भ दिला आहे. पोलंड येथूनही मुंबईत महिला वेश्या व्यवसायासाठी आल्याचा दाखला त्यांच्या पुस्तकात आहे.

युरोपियन वेश्या मुंबईत कुठे काम करायच्या ?

युरोपातून आलेल्या बहुतांश महिला या मुंबईत ताडदेव, ग्रॅंट रोड आणि भायखळा येथे काम करायच्या. शुक्लाजी स्ट्रीटला त्यानंतर सेफ गल्ली किंवा व्हाईट लेन असे नामकरण झाले होते. त्यावेळीही वंशवादाची पवित्रा टिकवणे आणि गैरसमज रोखणे हा विषय राजकीय पातळीवर हाताळण्यात आल्याचाही त्यांच्या पुस्तकात उल्लेख आहे. प्रामुख्याने तीन प्रकारे हे कुंटणखाने त्यावेळच्या वसाहतवादी प्रशासनामार्फत नियंत्रित केले जायचे. त्यामध्ये ब्रिटीश सैनिकांसाठी आणि नाविकांसाठी सेक्सच्या सुविधा पुरविणे, आंतरवंशीय सेक्स प्रतिबंधित करणे आणि ब्रिटीश नागरिकांचा सन्मान ठेवणे या तीन गोष्टी ब्रिटीश प्रशासकांकडून कटाक्षाने पाळल्या जायच्या.

ब्रिटीशांचे मुंबईतील वेश्या व्यवसायावरील नियंत्रण

ब्रिटीश प्रशासकांकडून हे कुंटनखाने नियंत्रित केले जात असले तरीही या प्रशासकांकडून एक गोष्ट निश्चित केली जायची ती म्हणजे या कुंटनखाण्यात काम करणाऱ्या महिला या ब्रिटीश नसतील. त्यामुळे ब्रिटीश महिलांची चुकीची प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठीचा कटाक्ष या प्रशासकांकडून पाळला जायचा.


 

First Published on: March 30, 2021 8:35 PM
Exit mobile version