पत्नीची हत्या करून मुलाला केले बेपत्ता; खारघरमधील चौघांना अटक

पत्नीची हत्या करून मुलाला केले बेपत्ता;  खारघरमधील चौघांना अटक

मृत रत्नप्रभा म्हात्रे

बौद्ध समाजाच्या मुलीबरोबर मुलाने लग्न केले म्हणून म्हात्रे कुटुंबिय सुन रत्नप्रभाला वारंवार त्रास देत होते. शेवटी त्यांनी तिला मृत्यूच्या खाईत लोटल्याचा खळबळजनक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. रत्नप्रभा यांचा १० महिन्यांचा मुलगा गायब असून त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्याचीही विल्हेवाट म्हात्रे कुटुंबियांनी लावली असावी, असा संशय मृत रत्नप्रभा म्हात्रे यांची बहिण मनीषा लोखंडे हिने केला आहे. रत्नप्रभाने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. तसंच पोलीस आम्हाला सहकार्य करण्या ऐवजी म्हात्रे परिवारालाच सहकार्य करत असल्याचाही आरोप लोखंडे यांनी केला आहे.

या प्रकरणात गणेश शांताराम म्हात्रे (पती), वंदना शांताराम म्हात्रे (सासू), रुपेश म्हात्रे (दीर) व दिनेश म्हात्रे (दीर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत रत्नप्रभा म्हात्रे या बौद्ध समाजाची असून तिचा ३ ऑक्टोबर २०१५ रोजी गणेश म्हात्रे याच्याशी त्यांचा विवाह झाला. या लग्नाला म्हात्रे परिवाराचा विरोध असल्याने त्यांनी रत्नप्रभा म्हात्रे हिचा छळ सुरु केला. या प्रकाराला कंटाळून रत्नप्रभा आणि गणेश यांनी नेरूळ सेक्टर -६ ला काही दिवस आपला संसार थाटला. त्यादरम्यान गणेशला काम नसल्याने पत्नीच्या मागे त्याने पैशासाठी तगादा लावत पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान रत्नप्रभा म्हात्रे या गर्भवती राहिल्या आणि गणेशने तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली.

‘लग्न झाल्यापासून माझ्या बहिणीचा छळ सुरु होता. तिला अनेकदा नवर्‍याकडून मारहाणही झाली होती. मुलगा झाल्यानंतर अनेक महिने ती आमच्याकडेच होती. जशी ती तिच्या सासरी गेली त्यानंतर ५ ते ६ दिवसांतच तिचा मृत्यू झाला. जर काही त्रास असता तर आम्हाला तिने नक्कीच सांगितले असते. याचा तपास आम्ही केला असता तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचे आम्हाला कळले आहे. त्यामुळे म्हात्रे परिवारावर कठोर कारवाई करण्यात यावी. रत्नप्रभाचे १० महिन्यांचे बाळ कुठे आहे याचा थांगपत्ता नाही.’- मनीषा लोखंडे – बहिण (मयत रत्नप्रभा म्हात्रे)

माझे बाळ तुझ्या पोटात आहे, नाहीतर तुला कधीच मारुन टाकले असते अशी धमकी त्याने रत्नप्रभा यांना दिली होती. घर चालवणे असह्य झाल्याने पत्नीला तिच्या आईकडे सोडून गणेश म्हात्रे खारघरला राहायला गेला. काही महिन्यांनी पुन्हा गणेश म्हात्रे याने पत्नी रत्नप्रभाकडे घरी येण्याचा तगादा लावला असता तिने नकार दिला. मात्र तरीही तो जबरदस्तीने तिला घेऊन गेला. बाळ आणि पत्नीला घरी नेल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी सकाळी रत्नप्रभा म्हात्रे यांच्या बहिणीला गणेश फोन करून सांगितले की, तुझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याची तक्रारी मनीषा लोखंडे यांनी पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यास गेलो असता पोलीसानीही तक्रार घेण्यास नकार दिला असे मनीषा लोखंडे यांनी सांगितले. शवविच्छेदन अवहालात रत्नप्रभा म्हात्रे हिला गंभीर मारहाण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचे लोखंडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

‘रत्नप्रभा म्हात्रे यांच्या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून लवकरच सत्य बाहेर येईल’.-प्रदीप तीदार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खारघर पोलीस ठाणे

 

First Published on: September 18, 2018 4:30 AM
Exit mobile version