बेस्टचा पांढरा हत्ती, हायब्रीड बस कमाई करेनात!

बेस्टचा पांढरा हत्ती, हायब्रीड बस कमाई करेनात!

Hybrid Bus MMRDA

मुंबईतील वाहतुकीला अद्ययावत पर्याय म्हणून हायब्रिड बसचा पर्याय पुढे आला खरा. पण हायब्रिड बसचा देखील पांढरा हत्ती होणार की काय, अशीच कामगिरी पहिल्या तीन महिन्यातील आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताफ्यातील हायब्रिड बसेसची कामगिरी हा बेस्टसाठी आता चिंतेचा विषय बनला आहे. अवघ्या काही दिवसांतच मार्गात बदल, तसेच काही मार्ग बंद करण्याची वेळ या उपक्रमावर आली आहे. काही बसेस दिवसभर न चालवता काही ठराविक वेळेतच चालवण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. पर्यावरणपूरक अशा 25 बसेस मार्च महिन्यात सुरू झाल्या होत्या. कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक या बस खरेदीसाठी करण्यात आली आहे.

५० कोटींना झाली बसेसची खरेदी

मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. सुमारे ५० कोटींना या २५ बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. वातानुकूलित, वाय-फाय, युएसबी कनेक्शन, एफ एम रेडिओ यासारख्या सुविधा या बसमध्ये आहेत. कार वापरकर्ते बसेसकडे वळावेत हा या बस खरेदीमागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

मुंबईसाठी एकूण ८० बसेस मंजूर

अवजड उद्योग मंत्रालयाने आणखी ८० बसेस मुंबईसाठी मंजूर केल्या आहेत. पण आताच्याच २५ बसेसची सुमार कामगिरी पाहता या जादा बसेसचं काय होणार? असाच प्रश्न निर्माण होत आहे. याच मंत्रालयाने इलेक्ट्रिक बसेसदेखील बेस्ट उपक्रमासाठी मंजूर केल्या आहेत.

हायब्रिड विरूद्ध इलेक्ट्रिक

हायब्रिड बसची इलेक्ट्रिक बॅटरी चार्ज करण्यासाठी डिझेल जनरेटरचा वापर करण्यात येतो. इलेक्ट्रिक आणि डिझेल या दोन ऊर्जा स्त्रोताच्या वापरामुळेच या तंत्रज्ञानाला हायब्रिड तंत्रज्ञान म्हणून संबोधलं जातं. तर इलेक्ट्रिक बसची बॅटरी पूर्णपणे विजेचा वापर करून चार्ज करण्यात येते. सद्यस्थितीला इलेक्ट्रिक बसच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. वाहतूक क्षेत्राचं भविष्य म्हणून इलेक्ट्रिक बसकडे पाहिलं जात आहे.

८ मार्गांवर धावतात २३ बसेस

महिन्यापोटी २५ लाख रुपयांचा महसूलही हायब्रिड बसेसना गाठता आलेला नाही. सध्या ८ मार्गांवर सरासरी २३ बसेस धावत आहेत. पण एमएमआरडीएच्या हायब्रिड बसेस मात्र मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या नाहीत. मुंबईच्या विविध मार्गांवर चालणाऱ्या हायब्रिड बसेससाठी मे महिन्यात अवघ्या ८० हजार प्रवाशांनी महिन्याभरात प्रवास केला आहे.

बेस्टच्या विविध मार्गांवर या हायब्रिड बस धावत आहेत. पण बेस्टचाही या बसेसच्या निमित्ताने प्रयोगच सुरू आहे. बीकेसी-२४ या मार्गावरील बस कमी प्रतिसादामुळेच बेस्टने बंद केली आहे. तर ६ नव्या मार्गांवर हायब्रिड बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

हायब्रिड बसची कामगिरी
महिना प्रवासी महसूल
मार्च ४३ हजार ४०२ ९ लाख ९२ हजार
एप्रिल ८२ हजार १५४ २३ लाख २४ हजार १९१
मे ८० हजार २१६ २४ लाख ९२ हजार १३३

 

हायब्रिड बसेससाठी नवीन मार्ग

बीकेसी १४ – हिरानंदानी (पवई) ते बीकेसी (सीप्झ मार्गे)

बीकेसी १५ – स्वामी समर्थ नगर (अंधेरी) ते बीकेसी (व्हाया जे.व्ही.पी.डी., एस. व्ही. रोड)

 

अतिरिक्त बस थांबे

बीकेसी १० – या बस मार्गावर दत्तीनी पार्क, बाण डोंगरी, वनराई

बीकेसी ११ – मार्गावर भांडूप पंप हाऊस, कामराज नगर, जिजाबाई भोसले मार्ग

बीकेसी १२ – रिजेन्सी/एसबीआय

बीकेसी १३ – एशियन पेंट्स, मंगतराम पेट्रोल पंप, श्रेयस सिनेमा, सर्वोदय हॉस्पिटल

First Published on: June 29, 2018 4:45 PM
Exit mobile version