पती मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय!

पती मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात वेगवेगळे पैलू बाहेर येत आहेत. मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांनी एटीएसला दिलेल्या तीन पानांच्या जबाबात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरआपल्या पतीच्या हत्येचा थेट संशय व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क केलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सचिन वाझे काही महिने वापरत होते, असेही विमला हिरेन यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

रविवारी एटीएसच्या अधिकार्‍यानी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करणे, कट रचणे या अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. दरम्यान एटीएसने घेतलेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर ) हा मंगळवारी व्हायरल झाला. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन हिने दिलेल्या जबाबात अनेक बाबींचा खुलासा केला आहे. अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांची स्कार्पिओ आढळल्याच्या घटनेपासून माझे पती मनसुख हे तीन दिवस वाझे यांच्या सतत संपर्कात होते. रात्री देखील त्यांच्यासोबतच घरी परतत होते. नोव्हेंबर २०२० मध्ये माझ्या पतींनी स्कॉर्पिओ कार सचिन वाझे यांना काही महिने वापरायला दिली होती. त्यानंतर ही कार वाझे यांनी आमच्याकडे पुन्हा आणून सोडली होती, असे विमला यांनी म्हटले आहे.

आमची कार अंबानी यांच्या घराजवळ मिळून आल्यानंतर विविध सुरक्षा यंत्रणांनी तसेच पोलिसांनी माझ्या पतीकडे चौकशी केली होती. तसेच एटीएसचे विक्रोळी येथील पथकाने माझ्या पतीला मध्यरात्री बोलवून रात्रभर बसून ठेवले होते आणि सकाळी ६ वाजता त्यांना घरी जाऊ दिले होते. वेगवेगळ्या पोलीस यंत्रणा तसेच पत्रकाराकडून सतत फोन करून त्रास दिले जात असल्या कारणाने माझ्या पतींनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त मुंबई, ठाणे यांना अर्ज करून त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत कळवले होते.

३ मार्च रोजी माझे पती रात्री घरी आले असता त्यांनी मला सांगितले की, सचिन वाझे सांगताहेत तू या गुन्ह्यात अटक हो. दोन, तीन दिवसात तुला जामिनावर बाहेर काढतो. मात्र मी माझ्या पतीला सांगितले की, तुम्हाला अटक होण्याची गरज नाही. आपण कुणाचा तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ, असे विमला यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. ४ मार्च रोजी माझे पती मनसुख संध्याकाळी लवकर घरी आले असता त्यांना विचारले तर त्यांनी मला बाहेर जायचे आहे, असे सांगितले. तुम्ही एकटे जाऊ नका कुणाला तरी सोबत घेऊन जा, असे मी त्यांना सांगितले. तेव्हा कांदिवली वरून तावडे यांचा फोन आला आहे. घोडबंदरला जायचे आहे. पोलीस आपलेच आहेत मला काही होणार नाही असे मला सांगून माझे पती घरातून बाहेर पडले आणि रिक्षाने गेले, अशी माहिती विमला यांनी एटीएसला जबाबात दिली आहे.

५ मार्च रोजी माझे पती मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. त्यावेळी त्यांच्या तोंडावर स्कार्प आणि हातात रुमाल होते अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी आम्हाला दिली. त्या शिवाय मृतदेहाजवळ काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. माझे पती मनसुख घरातून बाहेर पडले त्या वेळी त्यांच्या तोंडावर पायोनीआर कंपनीचा काळ्या रंगाचा मास्क होता. मोबाईल फोन, गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चैन, अंगठी, टायटन कंपनीचे घड्याळ आणि पैशांचे पाकीट त्यात सहा एटीएम आणि क्रेडिट कार्ड आणि काही पैसे होते, मात्र यापैकी काहीच मिळून आले नसल्याचे विमला यांनी म्हटले आहे.

First Published on: March 10, 2021 4:15 AM
Exit mobile version