नव्या प्रवेश पद्धतीमुळे आयसीएसईचा विद्यार्थी संभ्रमात

नव्या प्रवेश पद्धतीमुळे आयसीएसईचा विद्यार्थी संभ्रमात

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सीबीएसई व आयसीएसई या अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी बेस्ट ऑफ फाईव्ह किंवा सर्व सहा विषयांच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेता येत होता, परंतु गुरुवारी शिक्षण विभागाने प्रवेशाच्या संकेतस्थळावर आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी त्यांचे पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरण्याची सूचना जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेल्या विषयांपैकी पाच गुणांच्या सरासरीच्या आधारे किंवा सर्व सहा विषयांच्या गुणांच्या आधारे प्रवेश अर्ज करता येत होता, पण शिक्षण विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या सूचनेनुसार आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी त्यांना पहिल्या पाच विषयाचेच गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यांना सहाव्या विषयाचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरता येणार नाहीत, असे म्हटले आहे. शिक्षण विभागाकडून जाहीर केलेल्या सूचनेबाबत कोणतीही आगाऊ सूचना दिली नसल्याचे आयसीएसई बोर्डाच्या मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले. 2018 पासून शिक्षण विभागाकडून आयसीएसईच्या ग्रुप 1 व 2 च्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्ह किंवा सर्व सहा विषयांच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जात असे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 व 2 मधील विद्यार्थी बेस्ट ऑफ फाईव्ह घेऊ शकतात, पण त्यांना घ्यायचे नसल्यास ते सहा विषय घेऊ शकतात, पण आता शिक्षण विभागाच्या नव्या सूचनेनुसार त्यांना पहिल्या पाच विषयांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरता येणार असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने काढलेला हा निर्णय चुकीचा आहे. बहुतेकांनी जुन्या पद्धतीने अर्ज भरलेले आहेत आणि आता आम्हाला प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात मेसेज आले आहेत, हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया आयसीएसईच्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्ह ही पद्धत लागूच राहणार आहे. फक्त त्यांना प्रवेशासाठी सहाव्या विषयाचे गुण भरता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

First Published on: June 22, 2019 5:32 AM
Exit mobile version