वनऔषधींची ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून ओळख

वनऔषधींची ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून ओळख

वनऔषधी

परिसरात नेहमीच दिसणाऱ्या झाडांची ओळख आणि उपयुक्तता सर्वांना माहिती असतेच असे नाही. याच पार्श्वभूमीवर पोद्दार आयुर्वेदीक महाविद्यालयाकडून पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वनऔषधांची ओळख व्हावी आणि त्यांचा उपयोग काय, याचं मार्गदर्शन मिळावं यासाठी ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तसेच ती वनस्पती प्रत्यक्षातही दाखवण्यात येणार असल्याचं पोद्दार आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांनी दिली. मुंबई परिसरातच अनेक प्रकारच्या वनौषधी आहेत. मात्र, याची माहिती अनेक जणांना नसते. तसेच लहान मुलांमध्ये वनौषधींची उत्सुकता वाढावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे डॉ. खटी यांनी सांगितले.

वनौषधांची माहिती ऑडीओ, व्हिडिओतर्फे दिली जाणार आहे. शिवाय ती वनस्पती लगेचच दाखवली जाणार आहे. आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. याबाबत बैठका सुरू असून कार्यक्रमापूर्वी पोद्दारमधील विद्यार्थ्यांसाठी सेमिनार होणार आहे. डायबिटीस, संधीवातासारख्या आजारांवर आयुर्वेदातील वनस्पती आपल्या परिसरातच आढळत असल्याची माहिती यात देण्यात येईल.
– डॉ. गोविंद खटी, अधिष्ठाता, पोद्दार आयुर्वेदीक महाविद्यालय

प्रदर्शनात माहिती देणार 

अडुसळा, शतावरी, पिंपळ, औदुंबरसारख्या नियमित दिसणाऱ्या वनस्पतींचा औषध म्हणून वापर होतो. वरळी मुंबई परिसरातच ६० ते ७० प्रकारची ओल्या वनस्पती असल्याची माहिती पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आयुर्वेदाचार्य दीपक केसरकर यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे लहान मुलांनादेखील वनौषधींची माहिती होऊन आयुर्वेद विषय शिकण्याची इच्छा होईल. मल्टी व्हिटॅमिनच्या पिढीला वात, कफाचा संबंध येत नसल्याने हा उपक्रम स्तुत्य असल्याचे डॉ. केसरकर म्हणाले. १० मार्चपासून पोद्दार आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये ही माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात येईल.

First Published on: February 19, 2019 7:56 PM
Exit mobile version