आयडॉल आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांची गैरसोय

आयडॉल आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांची गैरसोय

तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकललेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र नव्या वेळापत्रकानुसार आयडॉलची परीक्षा आणि विधी शाखेच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटीच्या परीक्षेला मुकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली आहे.

कोरोनामुळे यंदा मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे परीक्षा १९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. आयडॉलकडून परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार २ नोव्हेंबरला आयडॉलच्या पदव्युत्तर शाखेची परीक्षा होणार आहे. मात्र त्याच दिवशी विधी शाखेची सीईटीची परीक्षा आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी अनेक दिवसापासून तयारी करत आहेत. मात्र मुंबई विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. म्हणून मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या पदव्युत्तर शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष अ‍ॅड. संतोष धोत्रे यांनी केली आहे.

First Published on: October 20, 2020 1:31 PM
Exit mobile version