सीईटीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना आयडॉलचा दिलासा

सीईटीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना आयडॉलचा दिलासा

सीईटी परीक्षा आणि आयडॉलची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने स्वतंत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेत सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. विधी आणि बीपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा ६, ७ व ९ नोव्हेंबरला घेण्याचे ठरवले आहे. परंतु या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना onlineexam२०२०@idol.mu.ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विधी, बीपीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश २, ३, ४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. याचे वेळापत्रक सीईटी सेलने २१ सप्टेंबरला जाहीर केले आहे. यानंतर आयडॉलने तृतीय वर्ष बीए, बीकॉम व एमए या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. सीईटी परीक्षा आणि आयडॉलची परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देत आयडॉलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. याची दखल घेत आयडॉलने २, ३, ४ नोव्हेंबरला होणार्‍या विधी व बीपीएड या सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ६, ७ व ९ नोव्हेंबरला स्वतंत्र परीक्षांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांनी आयडॉलने दिलेल्या onlineexam२०२०@idol.mu.ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र देखील ईमेलवर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाईल क्रमांक व परीक्षा देणार्‍या पेपरचे नाव इत्यादी माहिती ईमेलमध्ये देण्यात यावी, यानुसार या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

First Published on: October 22, 2020 4:07 PM
Exit mobile version