यशवंत जाधव महापौर झाल्यास स्थायी समितीत वारसदाराचा शोध?

यशवंत जाधव महापौर झाल्यास स्थायी समितीत वारसदाराचा शोध?

करोनामुळे मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. एकूण मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ५ हजार ४०० कोटी रुपये आहे. मात्र, दहा दिवस शिल्लक असून अजूनही ४ हजार कोटींचा पल्ला लांब आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गाचे पडल्याने आणि त्यावर आता शिवसेनेच्या वतीने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने स्थायी समिती अध्यक्षपदाचा वारसदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मातोश्रीवरून यशवंत जाधव यांच्या नावालाच पसंती असली तरी खुद्द यशवंत जाधव हे महापौरपदाबाबत उत्सुक नाहीत. तरीही या पदावर जाधव यांना विराजमान व्हावे लागल्यास स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकावी? याबाबत खुद्द मातोश्रीवर खल सुरु आहे.
दोन वेळा महापौरपदाची हुलकावणी मिळालेल्या यशवंत जाधव यांच्याकडे पुन्हा महापौरपदाची संधी चालून आली आहे. तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या यशवंत जाधव २०१७-१८मध्ये सभागृहनेते आणि त्यानंतर २०१८पासून स्थायी समिती अध्यक्षपदी आहेत. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आल्यामुळे यशवंत जाधव हे प्रबळ दावेदार ठरले आहेत.

बुधवारी शिवाजीपार्क येथील जुन्या महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी यशवंत जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांची इच्छा असेल तर महापौरपद स्वीकारावे लागणार असून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि निवडणुकीपूर्वी जाधव यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपसारखा आक्रमक पक्ष विरोधात असताना स्थायी समिती अध्यक्ष हा कणखर आणि आक्रमक असायला हवा. त्यामुळे यशवंत जाधव यांचा वारसदार कुणाला नेमणार की स्थायी समिती अध्यक्षपदी कायम राहत पक्षप्रमुखांना महापौरपदासाठी दुसर्‍या नावाचा विचार करण्यास ते भाग पाडतात का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. जाधव यांनी महापौरपद स्वीकारल्यास चार महिन्यांकरता स्थायी समिती अध्यक्ष निवडावा लागेल. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या या रेसमध्ये मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, राजुल पटेल, शुभदा गुडेकर आदींची नावे स्पर्धेत राहणार आहेत.

विशाखा राऊत यांची फिल्डींग

यशवंत जाधव यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आल्यानंतर, सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही मातोश्रीवर महापौरपदासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. यशवंत जाधव यांनी महापौर पदासाठी नकार दिल्यास विशाखा राऊत यांचे नाव पुढे येत असून महापालिकेतील बहुतांशी महिलांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवत पाठिंबाही दिला आहे. विशाखा राऊत या माजी महापौर असून १९९७मध्ये एक वर्षासाठी महापौर होत्या. मात्र, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राऊत यांना महापौरपदाचे आश्वासन मातोश्रीवरून देण्यात आल्याने त्यांचीही इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, विशाखा राऊत यांचे नाव पुढे आल्यास माजी महापौर श्रध्दा जाधव याही आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वडाळा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे श्रध्दा जाधव यांचा मातोश्रीवर कसा सन्मान राखला जातो? याकडेही लक्ष आहे.

First Published on: November 14, 2019 10:54 PM
Exit mobile version