विनापरवाना पार्ट्या कराल तर जेलमध्ये जाल!

विनापरवाना पार्ट्या कराल तर जेलमध्ये जाल!

Drink

नववर्षाच्या स्वागतासाठी आणि २०१८ या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोषात तयारी सुरु असताना नवी मुंबई पोलिसांनी त्यात नियमांची भर टाकली आहे. काहीही करा पण परवानगी घेऊन, जर विनापरवाना पार्ट्या अथवा वाहतूक कराल तर थेट जेलमध्ये जाल, असा सज्जड इशारा नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी दिला आहे. रविवारी रात्रीपासूनच शहरात बंदोबस्त लावण्यात येणार असून त्याची रंगीत तालीमही त्याच दिवशी घेण्यात येणार आहे. सोमवारी रात्री १० नंतर सुरू झालेला बंदोबस्त दुसर्‍या दिवशी सकाळी ७ पर्यंत राहणार असून यादरम्यान नियम, कायदा मोडणार्‍यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात येईल, असे कुमार यांनी सांगितले.

एकीकडे नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असतानाच संपूर्ण पोलीस यंत्रणा मात्र त्याच दिवशी रस्त्यावर उतरणार आहे. ४ डीसीपी, ६ ऐसीपी व १६०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून धिंगाणा घालणार्‍या तळीरामांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणार्‍या आणि मद्यप्राशन करून वाहन चालविण्यार्‍यांवरही पोलीस करडी नजर ठेवणार आहे. मद्यप्राशन करणार्‍या प्रत्येक व्यक्तीकडे मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना असणे गरजेचे आहे. तो जर मद्यपान करून गाडी चालवताना आढळला तर त्याला गाडीसह पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी चालणार्‍या पार्ट्यांमध्ये जर परदेशी दारू असेल तर ती त्यासाठीही ती दारू पिण्यासाठी परवाना लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमात राहूनच नववर्षाचे स्वागत करा,आम्ही परवानग्या देण्यासाठीच बसलो आहे. त्याचे उलंघन केले तर नववर्षाच्या सुरुवातीलाच तुरुंगात जावे लागेल असे यावेळी कुमार यांनी सांगितले.ज्यावेळी रात्री १२ वाजता नववर्षाची सुरवात होते, त्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यावरही बंधने घालण्यात आली आहेत. फटाके जर वाजवायचे असतील तर त्याची सुरुवात ११.५५ मिनिटांनी करावी लागणार आहे व ती १२.३० पर्यंतच करावी लागणार आहे. त्यानंतर फटाके वाजवता येणार नाहीत. बार आणि रेस्टॉरंटला मात्र सकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली असून तळीरामांना सकाळी ५ वाजेपर्यंत मनोसोक्त दारू पिता येणार आहे. आनंद व्यक्त करा, पण शिस्तीने, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दर वर्षी नववर्षांच्या स्वागतासाठी शहरभर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तरुणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळते. तर नवी मुंबईचा रत्नहार असलेल्या पाम बीच मार्गालगत रोषणाईने सजलेले मुख्यालय व त्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे पाम बीच मार्गासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्षेत्रात पोलिसांची करडी नजर राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारमध्ये विविध प्रकारची सूट दिली जाते. त्यामुळे फूड विथ ड्रिंक तसेच विविध ठिकाणी नववर्षांच्या पार्ट्यांचे हॉटेलमध्ये आयोजन केले जाते.

शहराबाहेर जाणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे शीव-पनवेल महामार्ग, पाम बीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग यासह शहराअंतर्गत रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून पोलिसांनी नियोजन केले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाद्वारे अतिरिक्त पोलीस मनुष्यबळही देण्यात येणार आहे. पाम बीच मार्गासह शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह’साठी चेक पोस्ट करण्यात येणार आहेत. जर दारू पिऊन गाडी चालवताना सापडलात तर तीन महिन्यांसाठी त्याचा वाहतूक परवाना रद्द करण्यात येणार आहे. साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाची नजर राहणार आहे. रेव्ह पार्ट्याचे आयोजन कोठे केले जात आहे का? यासाठी माहिती तंत्रज्ञान कक्षही अलर्ट करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस व्यवस्था करण्यात येणार असून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

First Published on: December 31, 2018 5:51 AM
Exit mobile version