मुंबईकरांनो सावधान! पुढील 2 दिवसांत उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

मुंबईकरांनो सावधान! पुढील 2 दिवसांत उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या उष्णतेत सातत्याने वाढ होत आहे. या उष्णतेच्या वाढीमुळे मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत गुरुवारी कमाल तापमान बुधवारपेक्षा दोन अंशांनी अधिक वाढले होते. अशातच या तापमानात पुढील दोन दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबईत सकाळी थंड आणि दुपारी व रात्री गरम असे वातावरण असल्याने मुंबईकरांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.

मुंबईत गुरुवारी सांताक्रूझ येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान बुधवारपेक्षा २.२ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे बुधवारपेक्षा १ अंशांची वाढ नोंदवत कमाल तापमान ३२.२ अंश नोंदवले गेले. (imd predicts heatwave in mumbai)

येत्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिवसभर मुंबईकरांना तीव्र तापमान जाणवणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गुरुवारी हवेच्या खालच्या स्तरातून पूर्वेकडून येणारे वारे असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांमध्ये या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबई तसेच राज्यात इतर काही ठिकाणीही कमाल तापमानात वाढ नोंदवली जाणार आहे.

मुंबईप्रमाणेच अलिबाग, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, उद्गीर येथेही गुरुवारी कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ नोंदवण्यत आली आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाच पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. तर वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे ३९ आणि अमरावती, गोंदिया येथे ३८ अंशांच्या पुढे तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरी कमाल तापमानाएवढे आहे किंवा किंचित कमी आहे.

मराठवाड्यात परभणी, उद्गीर येथे ३९ अंशांहून अधिक तर बीड, नांदेड येथे ३८ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे ४०.२, जळगाव, जेऊर, सांगली येथे ३९ अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

कोल्हापूर येथे ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. गुरुवारी सातारा, सांगली, महाबळेश्वर येथे मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली तर कोल्हापुरात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या.

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

6 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 7, 8 आणि 9 तारखेलाही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.


हेही वाचा – पुण्यात ऊन-पावसाचा खेळ, पण नागरिकांना आरोग्याची भीती

First Published on: April 7, 2023 9:10 AM
Exit mobile version