पाच दिवसांच्या ३३ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

पाच दिवसांच्या ३३ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

प्रातिनिधीक फोटो

मुंबईत कोरोनाच्या सावटाखाली आतापर्यंतचा गणेशोत्सव साजरा झाला आहे. दीड दिवसांच्या, पाठोपाठ पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे गणेशभक्तांवर काही कडक नियमांची बंधने सरकारी आदेशाने लादण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारची विघ्ने दूर करणाऱ्या व गणेशभक्तांचा सदैव पाठीराखा असलेल्या विघ्नहर्ता गणेशाच्या कृपेमुळे भक्तांच्या अंतर्मनातील श्रद्धेवर घाला घालण्यात कोरोना नक्कीच अपयशी ठरला. या कोरोनामय वातावरणात मुंबईकरांची भक्ती, श्रद्धा यांचा विजय झाला.

मंगळवारी दुपारपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत समुद्र,नैसर्गिक तलाव, खाडी आदी नैसर्गिक विसर्जन स्थळी सार्वजनिक ३२८ गणेशमूर्तींचे तर ३३ हजार ३५१ घरगुती गणेशमूर्तींचे असे एकूण ३३ हजार ६७९ गणेशमूर्तींचे आणि ३,७६० गौरींचेही विसर्जन करण्यात आले. यामध्ये, कृत्रिम तलावातील १८५ सार्वजनिक गणेशमूर्तीं व १७ हजार ३४४ घरगुती गणेशमूर्तीं असे एकूण १७ हजार ५२९ गणेशमूर्तींचे आणि २,०१५ गौरींचा समावेश आहे. मात्र मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने गणेशभक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून जास्तीत जास्त कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यावर जोर दिला. पालिकेने घराजवळच कृत्रिम तलावांची व्यवस्था केल्याने गणेशभक्तांनी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या गणेशमूर्तींचेही भायखळा निवासस्थान परिसरातील कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले. मुंबई महापालिकेने नैसर्गिक विसर्जन स्थळी व कृत्रिम तलाव स्थळी पालिकेतर्फे कर्मचारी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, निर्माल्य व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती. मात्र गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करीत नाईलाजाने घरीच बाप्पांची आरती करून त्यांचे विधिवत विसर्जन केले व बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर येण्याची आग्रही विनंती केली.

First Published on: September 14, 2021 11:09 PM
Exit mobile version