मच्छिमार बांधवांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

मच्छिमार बांधवांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

राज्यातील सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना टाळेबंदीच्या काळात संपला असल्यास त्यांना नुतनीकरणासाठी १ एप्रिल २०२० पासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी दिली. क्यार आणि निसर्ग चक्रीवादळ तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या मत्स्य व्यवसायिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मत्स्यविभागाच्या वतीने घेण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले.

३० जून २०१७ आणि ३ जुलै २०१९ या दोन शासन निर्णयांनुसार मासेमारीसाठी ठेक्याने दिलेल्या तलावांची चालू वर्षाची तलाव ठेका रक्कम आणि इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची १० टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठी तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्राची लॉकडाऊन कालावधीत येणारी चालू वर्षाची भाडेपट्टीची रक्कम भरणे या दोन्हींसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचे शेख म्हणाले.

याशिवाय पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनासाठी देण्यात आलेल्या ठेक्याची रक्कम या कालावधीत आल्यास ती भरण्यास आणि निमखारे पाणी मत्स्यसंवर्धन/कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या परवान्याच्या नुतनीकरणास देखील सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोळंबी संवर्धन प्रकल्पांचे वीज देयक भरण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र दिल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.

First Published on: June 15, 2020 11:08 PM
Exit mobile version