मृत एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या ‘त्या’ निर्णयात सुधारणा

मृत एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या ‘त्या’ निर्णयात सुधारणा

एचआयव्ही

मुंबईतील एचआयव्ही तथा एड्सग्रस्त मृत व्यक्तीच्या पत्नीला महापालिकेच्यावतीने मासिक एक हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एचआयव्हीग्रस्त मृत व्यक्तीच्या पत्नीला एचआयव्हीची बाधा झालेली नसेल तरीही तिला याचा लाभ मिळणार आहे. या महत्त्वाच्या सुधारणेसह महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजुरी दिली.

मुंबईतील एचआयव्ही तथा एड्सग्रस्त मृत व्यक्तीच्या पत्नीला तसेच एचआयव्हीग्रस्त महिलांना मासिक अर्थसहाय्य देण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेच्यावतीने स्थायी समितीमध्ये मागील अनेक वर्षांपासून किरकोळ तरतूद केली जात आहे. या आर्थिक वर्षापासून मृत एड्सग्रस्तांच्या पत्नींना मासिक १ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा हा प्रस्ताव मंजुरीला आला होता. त्यामध्ये मृत एचआयव्हीग्रस्त व्यक्तीची पत्नी जर एचआयव्हीबाधित असेल, तरच तिला १ हजार रुपये मासिक अर्थसहाय्य देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी उपसूचना मांडून ही अट वगळण्याची मागणी केली. मृत एचआयव्हीग्रस्त व्यक्तीची पत्नी एचआयव्हीबाधित असो वा नसो, त्या विधवेला या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी सूचना राखी जाधव यांनी केली. त्यानुसार उपसूचनेसह मूळ प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

शिवसेनेने एचआयव्हीबाधित महिलांना अर्थसहाय्य देण्याची सूचना केली होती. त्यानुसार सतत पाठपुरावा करत एचआयव्हीग्रस्त व्यक्तींच्या पत्नींना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासिक एक हजार रुपयांची मदत या महिलांना केली जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

या योजनेचा लाभ हा दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे ईसीएसद्वारे विधवेच्या बँकेच्या खात्यात जमा होईल. मात्र, याचा लाभ विधवेलाच मिळणार आहे. पण तिच्या वारसांना मिळणार नाही. तसेच विधवेच्या मृत्यूनंतर याचा लाभ मिळणार नाही. विशेष म्हणजे लाभार्थी महिला देखील एचआयव्ही संक्रमित असावी तसेच नियमित एसआटी औषधोपचार घेणारी असावी ही अट मात्र काढून टाकण्यात आली आहे.

First Published on: July 11, 2019 4:37 AM
Exit mobile version