बोरघाटात टेम्पो अंगावर उलटून पाचजण जागीच ठार

बोरघाटात टेम्पो अंगावर उलटून पाचजण जागीच ठार

accident

अलिबाग बीचवर रविवारी मजा लुटून तळेगावकडे परतणार्‍या पाच तरूणांवर बोरघाटात मृत्यूने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव टेम्पो अंगावर उलटल्याने प्रदीप प्रकाश चोले (38), अमोल बालाजी चिलमे (30), नारायण राम गुंडाळे (28), गोविंद न्यानोबा नलवाड (26), निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (28) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मित्र बालाजी हरिश्चंद्र भंडारे हा बचावला.

मूळचे लातूरचे असलेले सहाही तरूण तळेगाव येथे कामाला होते. रविवार सुट्टी असल्याने अलिबाग येथे पिकनिकसाठी आले होते. बीचवर मौजमजा करून परत जात असताना बोरघाटात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे मार्ग या जोड रस्त्याजवळ सुरक्षित जागी लघुशंकेकरिता थांबले होते. त्याच दरम्यान द्रुतगती मार्गावरून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने जुन्या मार्गावर येण्यासाठी वळण घेतले. टेम्पोने वेगात वळण घेताच आटा भरलेल्या गोणीमुळे टेम्पो एक बाजूला कलंडला. रस्त्यानजीक थांबलेल्या पाचजणांवर उलटला. त्यांच्यातील बालाजी भंडारे काही अंतरावर असल्यामुळे बचावला तर त्याचे पाच मित्र टेम्पो आणि आट्याच्या गोणीखाली सापडले.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीकरिता स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, आयआरबीची देवदूत पथक इत्यादी मदत कार्यात सहभागी होऊन ढिगार्‍याखाली अडकलेले मृतदेह काढले. खोपोली नगर परिषदेच्या दवाखान्यात पाच जणांना मृत घोषित केल्यानंतर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सोमवारी सकाळी तहसीलदार इरेश चप्पलवार यानी खालापूर आरोग्य केंद्रात उपस्थित राहत शवविच्छेदन प्रक्रिया तातङीने व पार पाङण्यासाठी लक्ष घालत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यास सहकार्य केले.

सर्व एकाच गावचे रहिवाशी असून वंजारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. टेम्पो चालक द्रुतगती मार्गावरून ऐंशीपेक्षा जास्त वेगात आला तेव्हा जुन्या मार्गावर येताना गती कमी न करता वळण घेतल्याने अपघात घङला. अपघातानंतर टेम्पो चालकाने पळ काढला. टेम्पो चालकाचा घाट उतरण्याच्या शॉर्टकटने पाच बळी घेतले. पाचपैकी तिघांचे लग्न झाले होते. टेम्पो चालकाचा हलगर्जीपणामुळे तीन कुटूंबे उध्वस्त झाली.

First Published on: March 3, 2020 2:56 AM
Exit mobile version