पालिकेच्या कोल्डमिक्सला राज्यभर मागणी

पालिकेच्या कोल्डमिक्सला राज्यभर मागणी

कोल्डमिक्स

शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाबाबत संशय व्यक्त केला जात असताना कोल्डमिक्सची मागणी राज्यभरातून केली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता व प्रकल्प संचालक विनोद चिटोरे यांनी दिली.

दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर खड्डे पडतात. पालिकेने गेल्या काही वर्षात खड्डे बुजवण्यासाठी मिडास टच, हॉटमिक्स, कोल्डमिक्स यासारखे विविध तंत्रज्ञान वापरले आहे. सध्या पालिकेकडून वापरण्यात येणार्‍या कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजवल्यास दुसर्‍याच दिवशी पुन्हा खड्डे आहे तसेच दिसत असल्याने या तंत्रज्ञानाबाबत शंका उपस्थित केली गेली आहे. त्यातच कोल्डमिक्सचा प्लान्ट पावसाळ्यात बंद राहिल्याने कोल्डमिक्सचे उत्पादन बंद होते. यामुळे विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

कोल्डमिक्सच्या तंत्रज्ञानाबाबत शंका उपस्थित केली जात असताना कोल्हापूर, पुणे या महानगरपालिकांनी तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेकडून कोल्डमिक्स मिळेल का याबाबत चौकशी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० टन कोल्डमिक्सची मागणी केली आहे. त्यापैकी १० टन कोल्डमिक्स देण्यात आले आहे. आमची गरज भागवून जर जास्त उत्पादन झाले तर इतर महानगरपालिकांना कोल्डमिक्स देण्यात येईल, अशी माहिती चिटोरे यांनी दिली.

खड्ड्यांच्या २६१२ तक्रारी
१० जूनपासून अद्याप शहरात खड्डे पडण्याच्या २६१२ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी २३९२ तक्रारींची दखल घेण्यात आली असून २२० तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.
– विनोद चिटोरे, मुख्य अभियंता, रस्ते विभाग.

First Published on: September 6, 2018 12:42 PM
Exit mobile version