मुंबईत चाळी, झोपडपट्ट्यांपेक्षा इमारती, सोसायट्यांमध्ये वाढतोय कोरोना

मुंबईत चाळी, झोपडपट्ट्यांपेक्षा इमारती, सोसायट्यांमध्ये वाढतोय कोरोना

मुंबईत कोरोना आटोक्यात येत असल्याचे वाटत असताना त्याने पुन्हा डोक ेवर काढले आहे. मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर १.२० टक्के झाला आहे. मागील १२ दिवसांमध्ये मुंबईतील इमारती, सोसायट्यांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कंटेन्मेंट झोन म्हणून सीलबंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ८ हजार ६३६ वर पोहचली आहे. पॉश इमारती, सोसायट्यांमध्ये कोरोना वाढत असताना झोपडपट्टी, चाळींमध्ये मात्र कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सीलबंद करण्यात आलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्या २० ने कमी होऊन ५५७ इतकी झाली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा इमारतींमध्येच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 1 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत फक्त 12 दिवसांमध्ये इमारतीमधील कंटेनमेंट झोनची संख्या तब्बल 2334 इतकी वाढून 8637 वर पोहोचली आहे. झोपडपट्ट्या-चाळींमध्ये मात्र प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 20 ने कमी होऊन 557 झाली आहे. त्यामुळे बड्या सोसायट्या आणि इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे.

विना मास्क फिरणारे नागरिक आणि मंडईतील भाजीविक्रेत्यांमुळे मुंबईत कोरोना संसर्ग वाढण्यात भर पडत असल्याचाही आरोप होत आहे. पालिका वारंवार मास्क घाला, अशी विनंती करुनही नागरिक याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. मास्कसाठी मुंबईकरांना दंड सुद्धा आकारला जातो; पण भाजी मंडईत विक्रेते मास्क घालताना दिसत नाहीत. भाजी विक्रेत्यांचा नागरिकासोबत थेट संपर्क येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 दिवसांवर आला आहे. एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरु लागला आहे. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वेगाने दुप्पट होऊ लागले आहेत. तर रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे.

गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 80 ते 100 दिवसांवर स्थिरावला होता. 31 ऑगस्टला तो 84 दिवस इतका होता. मात्र, अवघ्या दहा दिवसात तो घसरुन तब्बल 58 दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी 67 दिवस होता.

गेल्या महिन्याभरात मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता 2000 हून अधिक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले आहे.

First Published on: September 16, 2020 7:12 AM
Exit mobile version