नव्या वर्षात ठाणेकरांसाठी खुशखबर!

नव्या वर्षात ठाणेकरांसाठी खुशखबर!

पाहणी करताना अधिकारी...

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणाच्या उंचीचे काम अंतिम टप्प्यात असून बारवी धरणात ३४०.८६ दलघमी इतका पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच येत्या तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन औद्योगिक विकास महामंडळाने १९९८ साली बारवी धरणाच्या तिसर्‍या टप्प्याच्या कामाची सुरुवात केली. मात्र, विविध कारणांमुळे हे  काम दोन दशके रखडले होते. आता राज्य शासनानेच हे काम कोणत्याही परिस्थितीत येत्या पावसाळ्यापूर्वी  पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, प्रकल्पग्रस्तांचे  पुनर्वसन पूर्ण करून पाणी पुरवठा वाढवण्याची क्षमता पूर्ण करणार आहे. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी व कर्मचारी त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. येत्या जून अखेर धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण होऊन, धरणात ३४०.८६ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित पाहणी दौर्‍यात ही माहिती दिली.
बारवी धरणाची उंची वाढवण्यात येत असल्याने तोंडली, मोहघर, संलग्न  पाडे, काचकोळी, कोळीवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या सहा गावातील सुमारे १ हजार १६३ लोकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. घर, शाळा, मंदिर, रस्ते आदी प्राथमिक सुविधांसह घरटी एका व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून यापैकी ४६७ जणांची नावे अंतिम करण्यात आली असल्याचे अधिक्षक अभियंता पंडितराव यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप व इतर सुविधा ही कामे पूर्ण करण्यात येतील असे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. राज्याच्या जलसंपदा विभागाने बारवी धरणाचे काम पूर्ण होणार हे लक्षात घेऊन, वाढीव पाणीसाठ्यातून १३३.०७ दलघमी पाणी वाटप स्थानिक स्वराज्य संस्थाना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गेेली दोन दशके बारवी धरणाचे काम होऊन  ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
बारवी धरणाच्या उंचीचे काम अंतिम टप्प्यात असून जून अखेरपर्यंत काम पूर्ण होऊन बारवी धरणात 340.86 दलघमी इतका पाणीसाठा वाढणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना 3 महिन्यात भूखंडाचे वाटप करण्यात येईल.
– पंडितराव, अधीक्षक अभियंता, एमआयडीसी
First Published on: December 23, 2018 12:20 PM
Exit mobile version