शिष्यवृत्तीच्या परीक्षेत तब्बल 26 प्रश्न चुकले

शिष्यवृत्तीच्या परीक्षेत तब्बल 26 प्रश्न चुकले

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील महत्वाची मानली जाणार्‍या शिष्यवृत्तीची परीक्षा आता वादात अडकली असून या परीक्षेत एक दोन नव्हे तर तब्बल २६ प्रश्न चुकल्याची माहिती नुकतीच उजेडात आली आहे. राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेची मॉडेल अन्सरशीट नुकतीच प्रकाशित करण्यात आली, त्यावेळी वरील माहिती समोर आली आहे. दरम्यान, चुकलेले हे २६ प्रश्न रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी परिषदेतर्फे घेण्यात आला असून तांत्रिक कारणांनी हे प्रश्न चुकल्याचे कारण यावेळी परिषदेतर्फे देण्यात आले आहे. तर चुकलेल्या या प्रश्नांचे सरसकट गुण न देता, विद्यार्थ्यांनी दिलेल्या इतर प्रश्नांचे मूल्यमापन करुन त्यांना गुण देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यात २४ फेब्रुवारीला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच पार पडली होती. या परीक्षेसाठी पाचवीसाठी ५ लाख १२ हजार ६६७, तर आठवीसाठी ३ लाख ५३ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ५ हजार ८६९ केंद्रांवर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, सिंधी, तेलगू, कन्नड या सात माध्यमांमध्ये ही परीक्षा झाली. मात्र, या परीक्षेत पाचवीच्या परीक्षेत १३ आणि आठवीच्या परीक्षेत १३ प्रश्न चुकीचे असल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिका १ आणि प्रश्नपत्रिका २ अशा दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये मिळून एकूण २६ प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे हे प्रश्नच रद्द करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला. ‘तांत्रिक कारणांनी हे प्रश्न चुकले आहेत. त्या छपाईच्या, भाषांतरातील या चुका आहेत. तरीही या चुका का झाल्या याचे विश्लेषण करण्यात येत आहे. चुकलेले प्रश्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी समानता राहील. प्रश्न चुकले म्हणून सरसकट गुण न देता ते वगळून उर्वरित प्रश्नांचे मूल्यमापन करून गुण दिले जातील,’ असे परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य परिक्षा परिषदतर्फे नुकतीच मॉडेल अन्सरशीट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यावेळी वरील माहिती समोर आली असून त्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे आक्षेप ऑनलाइन पध्दतीनीचे स्विकारले जाणार असल्याचे परिक्षा परिषदतर्फे जाहीर करण्यात आले असून लवकरच अंतिम उत्तरसूची देखील जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा परिषदेच्या या निर्णयावर अनेकांकडून नाराजी व्यक्त केली असून याप्रश्नी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागणार असल्याचे देखील अनेक पालकांनी प्रतिक्रिया दिली.

First Published on: March 10, 2019 4:42 AM
Exit mobile version