दादर,धारावी, माहीममध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

दादर,धारावी, माहीममध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई महापालिकेच्या जी/ उत्तर विभागातील धारावी, दादर व माहीम या विभागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासात ७९ ने वाढ झाली आहे. धारावीमध्ये कालपर्यंत कोरोनाच्या १६ रुग्णांची, दादरमध्ये २९ तर माहीममध्ये ४४ अशा एकूण ८९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. धारावीमधील कोरोना रुग्णांची संख्या ४०, दादरमधील रुग्णसंख्या ५७ तर माहीममधील रुग्णसंख्या ७१ अशी एकूण १६८ एवढी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे धारावीत रुग्ण संख्येत २४ ने, दादरमध्ये २८ ने तर माहीममध्ये २७ ने वाढ झाल्याचे स्पष्ट होते.

मे २०२० मध्ये धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे धारावी हा विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र त्यावेळी पालिका आयुक्त पदाची सूत्रे नव्याने हाती घेणारे आयुक्त इकबाल चहल यांनी , दुसऱ्याच दिवशी तात्काळ धारावीत भेट देऊन युद्धपातळीवर कडक उपाययोजना केली. तसेच, या जी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनीही मोठया प्रमाणात उपाययोजना व प्रयत्न केल्याने धारावी, दादर व माहीम विभागातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या विभागात नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे.

सध्या धारावीत कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १८०, दादरमधील सक्रिय रुग्णांची संख्या २९७ तर माहीममधील सक्रिय रुग्णांची संख्या ३७७ एवढी असून जी/ उत्तरमधील या तिन्ही विभागातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ८५४ एवढी आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णांचा टप्पा ३ हजारांच्या पार, आज १० जणांचा मृत्यू

 

First Published on: March 22, 2021 10:45 PM
Exit mobile version