धूम्रपानविरहित तंबाखू सेवनावर लक्ष देणे गरजेचे

धूम्रपानविरहित तंबाखू सेवनावर लक्ष देणे गरजेचे

धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होतो हे माहित असूनही लोक सिगारेट आणि बिडीचे व्यसन करतात. शिवाय सिगारेट पिणार्‍यांच्या तुलनेत तोंडावाटे तंबाखू सेवन करणार्‍यांची संख्याही जास्त असल्याचे ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्वेशन २०१७ नुसार, अधिक असल्याचे समोर आले आहे. भारतातील ९० टक्के तोंडाच्या कॅन्सरला धूम्रपानविरहित तंबाखू सेवन कारणीभूत आहे. त्यामुळे फक्त धूम्रपान नव्हे तर धूम्रपानविरहित तंबाखू सेवनावरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

२७ जुलै हा जागतिक हेड अँड नेक कॅन्सर दिन म्हणून पाळला जातो. पण, अनेकदा धूम्रपान आणि त्याच्या दुष्परिणामाबाबत चर्चा केली जाते. तंबाखू सेवन म्हणजे फक्त सिगारेट, विडी नाही तर धूम्रपानविरहित तंबाखू म्हणजे तोंडावाटे तंबाखू सेवनाचाही समावेश होतो. तरीदेखील धूम्रपानविरहित तंबाखूपेक्षा फक्त धूम्रपानावरच लक्ष केंद्रीत जाते.
ग्लोबल अडल्ट टोबॅको २०१७ च्या सर्व्हेनुसार, २१.४ टक्के व्यक्ती धूम्रपानविरहित तंबाखू सेवन करतात. तर, १०.७ टक्के लोक धूम्रपान करतात. तर, ४८. ८ टक्के लोकांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला जातो तर फक्त ३१.१ टक्के लोकांना धूम्रपानशिवाय तंबाखू सेवन करणार्‍यांना तंबाखू सोडण्याचा सल्ला दिला जातो.

तंबाखू सेवन करणार्‍या प्रत्येकाला तंबाखूचे गंभीर दुष्परिणाम माहिती असले तरी धूम्रपान करणारे ५५.४ टक्के लोक धूम्रपान सोडण्याचा विचार करतात तर धूम्रपानविरहित तंबाखू सेवन करणारे ४९.६ टक्के लोक तंबाखू सेवन सोडण्याचा विचार करतात.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे हेड अँड नेक कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, धूर विरहित तंबाखू सेवनामुळे ९० टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो. बहुतेक रुग्ण हे धूर विरहित तंबाखूचे सेवन करतात. धूर विरहित तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती केल्या जातात. त्यामुळे, अशा तंबाखूचे सेवन करणारे काही जणच तंबाखू सेवन सोडण्याचा विचार करतात. लहान मूले अशा जाहिरातींकडे आकर्षित होतात आणि अशी उत्पादने खरेदी करतात. फ्लेवर माऊथ फ्रेशनर सुपारीचा वापर केला जातो. ज्यामध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेला कार्सिनोजेनिक घटक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. त्यामुळे आरोग्य सेवा पुरवणार्‍यांनी धूम्रपान आणि धूम्रपानविरहित तंबाखू सेवन करणार्‍यांना तंबाखू सोडण्याचा सल्ला द्यायला हवा.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मद्यपानाचे अति सेवनदेखील तोंडाच्या कॅन्सरसह अनेक कॅन्सरला कारणीभूत ठरु शकते. संबंध हेल्थ फाऊंडेशनचे विश्वस्त संजय सेठ यांनी सांगितले की, राज्यात तंबाखूसह गुटखा, पान मसाल्यावर बंदी घातली असली तरी सर्व ठिकाणी त्यांची सर्रास विक्री होते आहे. शाळा आणि कॉलेजबाहेर अशा तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने असल्याने मुलांना देखील ही उत्पादने सहज उपलब्ध होतात. रुग्णांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडावे, यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात. सर्वांनी गुटखा आणि तंबाखूवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एकत्र काम करायला हवे. यामुळे भावी पिढीमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी होईल.

First Published on: July 29, 2019 4:21 AM
Exit mobile version