आरोग्य, अन्न निर्मितीत विभागाचे वाढते योगदान

आरोग्य, अन्न निर्मितीत विभागाचे वाढते योगदान

आरोग्य क्षेत्रात कॅन्सरसाठी स्वस्त दरातील औषध निर्मिती ही अणुऊर्जा विभागासाठीचे प्राधान्य आहे. नजीकच्या काळातच कॅन्सरच्या उपचारासाठी रेडिओ फार्मासुटिकल्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. पण आता पुढच्या काळातील आव्हान म्हणजे अशा औषध निर्मितीमधून तयार होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावणे हे असणार आहे असे मत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव के एन व्यास यांनी व्यक्त केले आहे.

त्याअनुषंगाने रूग्णांशी संबंधित औषध निर्मितीतील कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी चाचण्यांची सुरूवात झाली आहे. रेडिओ फार्मासुटिकल्सच्या समितीच्या माध्यमातून यासाठीच्या परवानग्या देण्याची सुरूवात झाली आहे. बोर्ड ऑफ रेडिएशन एण्ड आयसोटोप टेक्नोलॉजी (ब्रीट) यांनी चार नवीन औषधांचे संशोधन नुकतेच केले आहे. न्युरो एन्ड्रोक्राईन ट्युमर्स, यकृत तसेच हाडांच्या दुखण्यासाठी कोल्ड किट आणि औषध या विभागाने तयार केली आहेत.

तसेच टीबीच्या निदानासाठी राजा रमण्णा सेंटर फॉर एडव्हान्स टेक्नॉलॉजीमार्फत ट्युबरक्युलोस्कोप हे स्वस्त दरातील ऑप्टिकल उपकरण तयार करण्यात आले आहे. तसेट ऑन्कोडायग्नोस्कोपच्या माध्यमातून दातांच्या आजाराची चाचणी करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर हे तंत्रज्ञान आता पोहचण्यासाठी सज्ज आहे.

डॉ होमी जहांगीर भाभा यांच्या ११० व्या जयंती निमित्ताने भाभा अणुसंशोधन केंद्रात स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने औद्योगिक सुरक्षिततेसाठी पारितोषिक तसेच देशपातळीवर आयोजित निबंध स्पर्धेसाठीचे पुरस्कार वितरण करण्यात आले. देशपातळीवर अन्न सुरक्षिततेसाठी अणुऊर्जा विभागाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे असे मत बीएआरसीचे संचालक डॉ ए के मोहंती यांनी मांडले. त्याअनुषंगानेच बीएआरसीच्या विभागाने तीन नव्या बियाणांच्या जाती आणल्या आहेत. या बियाणांच्या माध्यमातून धान्य उत्पादनात वाढ होईल असे मत त्यांनी मांडले. पाण्यातून आर्सेनिकचे प्रमाण कमी करण्यासाठीचे तंत्रज्ञानही दोन नवउद्योजकांकडे सुपूर्त करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

First Published on: October 31, 2019 5:56 AM
Exit mobile version