कृषीप्रधान भारतात अन्नपदार्थांची नासाडी, संपूर्ण जगामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

कृषीप्रधान भारतात अन्नपदार्थांची नासाडी, संपूर्ण जगामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

आपल्यापैकी अनेक जण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातात. त्यावेळी किंवा आपण घरी जेवतो तेव्हा ही आपण आपल्या ताटातील किती अन्न हे वाया घालवतो हे आपल्या लक्षात येत नाही. ही गोष्ट जरी वरकरणी पाहताना फार महत्वाची वाटली नसली तरी ती अत्यंत गंभीर आहे. भारतात आणि जगभरातच अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. ही नासाडी इतकी असते की यामध्ये अनेक गरजू लोकांचं पोट भरू शकते.

अन्नधान्याची नासाडी करण्यात संपूर्ण जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर पहिल्या क्रमांकावर चीन आहे. प्रतिवर्षी ९० हजार कोटी रुपये एवढ्या किमतीच्या ६.८ कोटी टन अन्नपदार्थाची भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. याचाच अर्थ असा की, भारतातील प्रत्येक व्यक्ती प्रतिवर्षी सरासरी ५० किलो अन्न वाया घालवतो. ही आकडेवारी फार मोठी आहे. याच मुद्द्यावर तज्ज्ञांचं असं मत आहे की, भारतात जेवढं अन्न वाया जातं तेवढ्या पैशात शीतगृह आणि फूड चेनची व्यवस्था सुरु करता आली असती आणि त्यामुळे भारतातील एकही व्यक्तीवर उपाशी राहण्याची वेळ अली नसती.

चीनमध्ये दरवर्षी ९. १ कोटी टन नान्नधान्याची नासाडी होते. यात दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे तर तिसऱ्या क्रमांकावर नायजेरिया हा देश आहे. नायजेरियामध्ये ३. ७ कोटी टन अन्न वाया जाते. तर अमेरिका हा चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत २ कोटी टन आणि इंडोनेशियामध्ये १. ९ कोटी अन्नधान्य प्रतिवर्षी वाया जाते. अन्नधान्य वाया जात असलेल्या देशांत इंडोनेशिया जगात पाचव्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या २०२१ च्य अहवालानुसार भारतामध्ये प्रतिवर्षी ४० टक्के अन्न हे हे विवाह आणि घरगुती समारंभात वाया जाते.आणि त्याचे कारण म्हणजे धान्य पुरवठ्यातील त्रुटी आणि अव्यवस्थेमुळे वाया जाते.भारतात प्रत्येक घराच्या किचनमधून अन्नपदार्थांची मोठया प्रमाणावर नासाडी होते आहे. हे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.

अन्नधान्य वाया जाण्यामध्ये भारताचा जसा आढावा घेतला तसाच आढावा फक्त मुंबई शहराचा सुद्धा घेण्यात आला आहे. मुंबई हे देशाच्या दृष्टीने महत्वाचं शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतच दररोज ६९ लाख किलो अन्न वाया जाते. भारतात २१०० कोटी किलो गहू प्रतिवर्षी खराब होतो. आणि भारतात जेवढा गहू खराब होतो तेवढ्या गव्हाचे उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये केले जाते. मुंबईमध्ये प्रति दिवशी ६९ लाख किलो अन्न हे विविध ठिकाणाहून कचऱ्याच्या टोपल्यांमध्ये फेकले जाते. मुंबईत जेवढे अन्न प्रतिदिवशी फेकले जाते तेवढं अन्न एकावेळी अर्ध्या मुंबईचे पोट भरू शकते.
एकीकडे अन्नपदार्थांची नासाडी होत असतानाच दुसरीकडे जगात ६९ कोटी लोक हे प्रतिदिवशी अर्धपोटी राहतात. जगभरात दरवर्षी २. ६ ट्रिलियन डॉलर एवढ्या किमतीचे ९३ कोटी टन अन्न प्रतिवर्षी वाया जाते. तर जगभरात ६९ कोटी लोक दररोज अर्धपोटी असतात. आणि अन्नपदार्थांची अशीच नासाडी होत राहिली तर २०३० पर्यंत हि संध्या ८४ कोटी एवढी होण्याची शक्याता आहे. अन्नपदार्थांची नासाडी करण्यात भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. कृषिप्रधान देश अशी भारताची ओळख आहे आणि त्याच भारतात एवढ्या मोठया प्रमाणात दररोज अन्नपदार्थ वाया जातात. त्यामुळे ही बाब नक्कीच गंभीर आणि भारतासाठी धोकायदायक आहे. त्यामुळे स्वतःच्या भविष्याचा विचार करता प्रत्येकाने जेवता स्वतःच्या ताटातील अन्नपदार्थ वाया जाणार नाहीत याची काळजी घेणे नक्कीच आवश्यक आहे.

First Published on: June 3, 2022 9:22 PM
Exit mobile version