‘रेलनीर’ची गाडी सुसाट

‘रेलनीर’ची गाडी सुसाट

Rail Neer

उन्हाळ्याची तीव्रता सतत वाढतच असल्याने साहजिकच रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची जास्त गरज भासू लागली आहे. यामुळे रेलनीरच्या बाटल्यांचा खप वाढला असून सध्या दिवसाला एक लाख ५० हजार बाटल्यांची विक्री होत आहे. मागील वर्षी मे महिन्यात १ लाख ६८ हजार बाटल्यांची विक्री झाली होती. मध्य रेल्वेने आरोग्याच्या कारणावरून रेल्वे स्टॉल्सवरील लिंबू पाणी नुकतेच बंद केले. त्यामुळे या वर्षी रेलनीरच्या बाटल्यांची विक्रमी विक्री होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबईत दररोज लोकलने ७५ लाख तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. सर्वाधिक गर्दीच्या विभागामध्ये मुंबईचा समावेश होते. या प्रचंड संख्येच्या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल्वेने पाणपोयांची सोय केली असली तरी अनेक स्थानकांत त्या बंद पडलेल्या आहेत. तसेच पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता नियमितपणे होतेच, याची खात्री नसल्याने या पाण्याचा पिण्यासाठी वापर टाळण्याकडे बहुतांश प्रवाशांचा कल असतो. त्यामुळे आयआरसीटीसीने पाण्याच्या रेलनीरचा बॉटल्या आणल्या आहेत. त्याच पाठोपाठ वॉटर व्हेंडींग मशिनसुद्धा सुरू केल्या आहेत. मात्र सतत वॉटर व्हेंडींग मशिनमध्ये बॉटल नसल्याने आणि मशिन बंद असल्यामुळे प्रवासी रेलनीरच्या पाणी बॉटलना पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षी एप्रिल महिन्यातच मुंबई विभागात १ लाख ५० हजारावर रेलनीरच्या बॉटल्यांची विक्री झाली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कार्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) अंबरनाथ येथे रेलनीरचा कारखाना आहे.

अहमदाबादमध्ये सुरू होणार कारखाना

रेलनीरच्या पाणी बॉटलचे उत्पादन वाढवण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कार्पोरेशनकडून अंबरनाथ कारखान्यानंतर आता अहमदाबादलासुद्धा रेलनीरचा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. या कारखान्याचे काम पूर्ण झाले असून काही दिवसातच हा कारखाना सुरू होणार आहे. त्यामुळे रेलनीरच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन वाढेल, अशी माहिती आयआरसीटीचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पिपिल यांनी दिली आहे. सध्या अंबरनाथ येथे रेलनीरचा कारखाना सुरू आहे. ज्याची उत्पादन क्षमता दररोज ७५ हजार आहे. मात्र सध्या १ लाख ५० हजार रेलनीरया बॉटल्यांची दररोज विक्री होत आहे. बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे आयआरसीटीसीने आता अहमदाबादमध्ये रेलनीर बाटली बंद पाण्याचा कारखाना सुरू करायचे ठरवले आहे.

First Published on: April 9, 2019 4:58 AM
Exit mobile version