एसटी कर्मचाऱ्याचा देशी जुगाड; भंगारातून सॅनिटायझर स्टॅडची निर्मिती

एसटी कर्मचाऱ्याचा देशी जुगाड; भंगारातून सॅनिटायझर स्टॅडची निर्मिती

एसटी महामंडळाच्या यांत्रिकी विभाग नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीसाठी नेहमीच परिचित आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीत एसटी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी गंगापूर आगारातील एका यांत्रिक कर्मचाऱ्यांने भन्नाट शक्कल लढवून कार्यशाळेत असलेल्या मोडक्या-तोडक्या लोखंडी भंगारातून चक्क सॅनिटायझर स्टॅडची निर्मिती केली आहे. त्याचे प्रात्यक्षिक करून एसटी कर्मचार्‍यांना दाखविण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांच्या आविष्कारामुळे सर्वत्र कौतूक होत आहे. या सॅनिटायझर मशिनचा एसटी महामंडळाला नक्कीच फायदा होणार आहे.

गेल्या अडीच महिन्यापासून राज्यभरातील एसटीचे चाक पुन्हा मार्गांवर येत आहे. एसटी महामंडळातील सर्व विभागातील कर्मचार्‍यांना कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. तसेच एसटीने कार्यशाळा सुध्दा सुरु केली आहे. मात्र, आता कर्मचारी कर्तव्यांवर येत असताना एसटी महामंडळाकडून कर्मचार्‍यांना मास्क बंधनकार करण्यात आले आहे. तसेच कर्मचार्‍याच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी महामंडळाकडून घेण्यात येत आहे. एसटी महामंडळाकडून कर्मचार्‍याना मास्क, सॅनिटायझर, फेस शिट आणि हॅण्ड ग्लोव्हज देण्यात येत आहे. तसेच एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभागात आणि कार्यालयात कर्मचार्‍यांचा हात निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर बॉटल ठेवण्यात आली आहे. मात्र, आता कर्तव्यावर आलेल्या प्रत्येक कर्मचारी सॅनिटायझरच्या बॉटलला हात लावत होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या गंगापूर आगारातील सहाय्यक यांत्रिक कर्मचारी किशोर चव्हाण यांनी चक्क सॅनिटायझर मशीन स्टँड तयार केले आहे. त्यासाठी त्यांना दोन दिवसाचा कालावधी लागला. मात्र, त्यांनी आपले कौशल्याच्या जोरावर कार्यशाळेत असलेल्या मोडक्या लोखंडी पट्टयापासून सॅनिटायझर स्टॅड तयार केले आहे. त्यासंबंधी त्यांनी व्हिडिओ केला असून तो सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यांचे तोंडभरुन कौतूक केले आहे.

सॅनिटायझर स्टँड

दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, माझा जन्म लोहार कुटुंबियात झाला असल्यामुळे पुर्वीपासून माझ्या अंगी हे कौशल्य आहे. जेव्हा मी एसटी महामंडळात सहाय्यक कर्मचारी म्हणून रुजू झालो, तेव्हापासून मी माझ्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करतो आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी मला सॅनिटायझर स्टॅण्ड तयार करण्यासाठी पुर्णपणे योगदान दिले आहे.

अशी लढवली शक्कल

किशोर चव्हाण यांना सॅनिटाझरच्या बॉटलपासून कर्मचार्‍यांना कोरोनाचा संर्सग होऊ शकतो. ही बाब लक्षात येताच किशोर यांनी तत्काळ कर्मचार्‍याचा सुरक्षेसाठी कार्यशाळेत उपलब्ध असलेल्या नॉयलन दोरी, एक छोटीशी तार, १४ व १२ इंच अशा दोन लोखंडी अँगल आणि ३९ इंचाची लोखंडीपटीच्या माध्यमातून हे सॅनिटायझर स्टॅण्ड बनविण्यात आले आहे. त्यासाठी गंगापूर आगारातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्यांच्या या कार्याला सहकार्य मिळाल्यामुळे अत्यंत कमी कालावधी भंगारात जमा झालेल्या लोखंडी पट्यापासून हे सॅनिटायझर स्टॅण्ड तयार केले आहे. आता इतर विभागात सुध्दा हे स्टॅण्ड तयार करण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांना सॅनिटायझरच्या बॉटलपासून संसर्ग होऊ नयेत, म्हणूण मी कार्यशाळेत असलेल्या वेस्ट मॅटेरिअलपासून सॅनिटायझर स्टॅण्ड तयार केले आहे. त्यासाठी मला दोन दिवसांचा कालावधी लागला आहे. या स्टँडमुळे कर्मर्‍यांना हात न लावता सॅनिटायझर घेऊन हात निर्जंतुकीकरण करता येणार आहे.
– किशोर चव्हाण, सहाय्यक यांत्रिक, गंगापूर आगार

First Published on: June 8, 2020 6:20 PM
Exit mobile version