इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज

किर्तनकार इंदुरीकर महाजारांवर पीसीपीएनडीटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निमूर्र्लन समितीने सोमवारी केली. अंनिसच्या अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्र्लन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे. सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. अशुभ वेळेला स्त्री संग झाल्यास अवलाद रांगडी, बेवडी आणि खानदानाचे नाव मातीत मिळवणारी होते. रावणाचा जन्म आण प्रल्हादाचा जन्म ही दोन उदाहरणेही आहेत, असेही इंदुरीकर महाराजांनी म्हटले होत. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. आता याप्रकरणी अंनिसने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पीसीपीएनडीटीच्या कायद्यातील कलम २२ चे उल्लंघन असे वक्तव्य करुन इंदुरीकर महाराजांनी केल्याचे या पत्रात म्हटले आहे. या कायद्यातील कलम २२ नुसार गर्भलिंग निदान निवडीबाबत फोन, इंटरनेट, छापील पत्रके, एसएमएस, मेसेज यांद्वारे निवडीची जाहिरात करण्यास बंदी आहे. एवढेच नाही तर इंदुरीकर महाराजांनी टायमिंग हुकले की क्वालिटी खराब असे म्हणून स्त्रियांचाही अपमान करणारे वक्तव्य केल्याचीही बाब या पत्रात नमूद आहे. ११ फेब्रुवारीला ही बाब समोर आली होती. तेव्हापासून हा वाद सुरु झाला. आता अंनिसनेही इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

First Published on: February 18, 2020 1:18 AM
Exit mobile version