शिवसेनाप्रमुखांचे आमच्यावर अनंत उपकार

शिवसेनाप्रमुखांचे आमच्यावर अनंत उपकार

Priya Dutt

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्या कुटुंबियांवर असंख्य उपकार आहेत. या उपकारांचा त्यांनी राजकारणाशी कधीच संबंध जोडला नाही. आम्हीही कधी त्यादृष्टीने विचार केला नाही. यामुळे काँग्रेसपासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला पक्षाचे काम करता येत नव्हते म्हणूनच सरचिटणीस पदावरून मोकळे करण्याची आपणच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मागणी केली होती, असे सांगून माजी खासदार प्रिया दत्त यांनी काँग्रेस सोडण्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी आक्षेप घेत पक्षातील एका गटाने दत्त यांच्या नावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रिया दत्त यांना सरचिटणीस पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. तशा आशयाचे सरचिटणीस अशोक गहेलोत यांच्या स्वाक्षरीचे पत्र दत्त यांना पाठवण्यात आले होते. नंतर दत्त यांच्याऐवजी काँग्रेस पक्षाकडून अभिनेत्री नजमा यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर प्रिया दत्त या काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, असे भाकित वर्तवले जात होते.
इतकेच नव्हे तर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही व्यक्त होत होती.

यावर दत्त यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी काँग्रेस सोडण्याचा आपला कुठलाही इरादा नाही, असे स्पष्ट केले. पक्षाच्या जबाबदारीतून दूर होण्यासाठी मीच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विनंती केली होती. आपल्याला पक्षाच्या पदाला न्याय देता येत नसल्याचे आपण पक्षाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते, असे प्रिया म्हणाल्या. सेनेत जाण्याचा आणि काँग्रेसमधील पद सोडण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. मी आजही काँग्रेसमध्येच आहे, आणि पुढेही काँग्रेसमध्ये राहणार आहे. निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिल्यास त्याचा आपण जरूर विचार करू, असे त्या म्हणाल्या.

First Published on: October 4, 2018 2:07 AM
Exit mobile version