२२ दिवसांच्या बाळाच्या शरीरातून काढली ‘सुई’, खासगी रुग्णालयाचा निष्काळजीपणा

२२ दिवसांच्या बाळाच्या शरीरातून काढली ‘सुई’, खासगी रुग्णालयाचा निष्काळजीपणा

शरीरातून यशस्वीरित्या सुई काढण्यात आली

जरा काही लागले किंवा खरचटले की, आपण लगेच त्यावर इलाज करतो. पण तान्ह्या बाळाला काही झाले की, त्याला नेमके काय झाले हे कळेपर्यंत तान्ह्या बाळाच्या आई-बाबांची दमछाक होऊन जाते. पनवेलच्या पाष्टे जोडप्यासोबतही असेच काहीसे झाले. जन्मानंतर वारंवार आजारी पडणाऱ्या मुलीच्या शरीरातून सुई काढण्यात आली आणि खासगी डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला.

बाळाच्या शरीरातून यशस्वीरित्या सुई काढण्यात आली

नेमकं काय झालं?

पनवेलमध्ये राहणाऱ्या पाष्टे कुटुंबात २२ दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. पण जन्मानंतर काहीच दिवसात बाळ सतत आजारी पडू लागले. तिला वारंवार ताप येऊ लागला. शिवाय तिच्या उजव्या मांडीला सूज आली. बाळाला नेमके काय झाले आहे ते आई-वडिलांना कळत नव्हते. म्हणून पाष्टे जोडप्यांनी बालरोगतज्ज्ञांची भेट घेतली. तेव्हा बाळाच्या मांडीची सूज पाहून डॉक्टरांनी एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड चाचणी करण्याचा सल्ला दिला. या चाचणीनंतर बाळाच्या उजव्या बाजूच्या कमरेच्या सांध्यामध्ये ऑस्टोमॅलॅलिस असल्याचे निदान झाले.

…आणि सुई सापडली 

शरीरातून काढलेली सुई

ऑस्टोमॅलॅलिस या आजारावर इलाज करण्यासाठी बाळाला परळच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु झाले. त्यानंतर एक्स-रे परत काढण्यात आला. डाव्या बाजूच्या कमरेच्या भागात काहीतरी बाहेरची वस्तू एक्स-रे रिपोर्टमध्ये दिसून आली. नक्की ही वस्तू काय आहे? हे पाहण्यासाठी पुन्हा एक्स-रे काढण्यात आले. त्यातही ती वस्तू दिसत होती. अखेर बाळाचा सीटी स्कॅनदेखील करण्यात आला. सीटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये ही बाहेरील वस्तू म्हणजे लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेली सुई असल्याचे निदान झाले.

१९ दिवस कमरेच्या सांध्यात होती सुई

जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाच्या मांडीतून २ सेंटिमीटर लांबीची सुई काढण्यात आली. ही सुई बाळाच्या डाव्या कमरेच्या सांध्याच्या प्रावरणाला चिकटलेली होती. ती यशस्वीरित्या काढण्यात आली असून सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. तब्बल १९ दिवस ही सुई त्या बाळाच्या कमरेत अडकली होती. दरम्यान, बाळाच्या शरीरात सुई गेली कशी? याबद्दल बाळाच्या पालकांना काहीही माहिती नव्हती. ही सुई लसीकरणादरम्यान गेल्याचे वाडिया रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

First Published on: July 19, 2018 6:24 PM
Exit mobile version