मुंबई महानगरपालिकेत महिला अधिकाऱ्यांवर होतोय अन्याय

मुंबई महानगरपालिकेत महिला अधिकाऱ्यांवर होतोय अन्याय

मुंबई महापालिका अवघ्या तीन महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या जयश्री भोज यांची अवघ्या तीन महिन्याच्या आतच बदली करण्यात आली. भोज यांनी जेव्हा या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनाचे संकट मुंबईवर ओढवले. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराऐवजी कोरोनाच्या उपाययोजनांची जबाबदारी त्यांच्या पडली आणि निष्क्रीयतेचा डाग लावत त्यांची बदली करण्यात आली. परंतु भोज यांच्या पूर्वी कर्तृव सिध्द करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणाऱ्या डॉ.अश्विनी जोशी, निधी चौधरी आणि पल्लवी दराडे यांची अशाच प्रकारे बदली करत त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेत कर्तृत्व सिध्द करण्याची संधी न देताच महिला अधिकाऱ्यांवर अन्याय केला जातो आणि भोज यांच्या रुपाने आणखी एका महिला अधिकाऱ्यावर अन्याय केला गेला आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांची बदल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर  १४ फेब्रुवारी २०२० रोजी जयश्री भोज यांची नियुक्ती शासनाने केली. मात्र, पदभार स्वीकारल्यापासून त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केली. भोज यांनी पदभार स्वीकारल्याने सिंघल यांच्याकडे असणारी खाती व विभाग त्यांच्याकडे न देता आयुक्तांनी रस्ते, पूल, पर्जन्य जलविभाग या विभागांची कामे काढून घेत सह आयुक्त आशुतोष सलिल यांच्या माध्यमातून आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका समजून घेण्यापूर्वीच त्यांना कोरोनाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे भोज यांची महापालिका समजून घेण्यापूर्वीच गच्छंती करण्यात आली.

मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रामाणिक आणि सचोटीने काम करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त असलेल्या डॉ. अश्विनी जोशी यांची अशाच प्रकारे बदली करण्यात आली होती. आय. ए. कुंदन यांच्या जागी जोशी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य, सुरक्षा, मुंबई अग्निशमन दल, आपत्कालीन नियंत्रण कक्ष आदींची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु आरोग्य विभागाची जबाबदारी पार पाडताना जोशी यांनी आजवर ज्या कामचुकार व फसवणूक करणाऱ्या औषध वितरक कंपन्यांना प्रशासन पाठिशी घालत होते. त्या कंपन्यांवर कारवाई करत त्यांना धडा शिकवला. प्रशासन औषध वितरकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या कृत्यावर डोळेझाक करण्याचे काम केले जायचे. त्यांच्यावर कारवाई करत जोशी यांनी आपल्या आक्रमकतेची पोच पावती दिली. परंतु, आज कोविड -१९च्या रुग्णांसाठी क्वांरटाईन तथा आता आयसोलेशन म्हणून वापरात असणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे जोशी यांच्या प्रयत्नांमुळेच ताब्यात आले आहे. विधी खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे विश्वासत घेत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून ते महापालिकेच्या ताब्यात मिळवले होते. त्यामुळेच आज सेव्हन हिल्सचा वापर महापालिका करू शकले. शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या कंत्राटातील गैरकारभार लक्षात येताच जोशी यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तिथेच खऱ्या अर्थाने परदेशी आणि जोशी यांच्या ठिणगी उडाली. पुढे जोशी यांच्या स्वाक्षरीशिवाय स्थायी समितीपुढे प्रस्ताव आणून मंजुर करून घेतला. पण पुढे हाच प्रस्ताव प्रशासनाला काही कारणास्तव मागे घेण्याची नामुष्की आली होती. अश्विनी जोशी या आरोग्य विभागाला योग्यप्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची बदली करण्यात आली.

जोशी यांच्याप्रमाणे सहआयुक्त निधी चौधरी यांनाही याच अनुभवातून जावे लागले. महापालिकेत सहआयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या निधी चौधरींना महापालिकेत उपायुक्त (विशेष) असे पद देत प्रथम त्यांचा अपमान केला होता. परंतु त्यांनी पदापेक्षा कामाला प्राधान्य दिले. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी विधी कामकाजात सुसुत्रता आणतानाच फेरीवाला धोरण, प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला गती दिली. फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून निम्म्यापेक्षा अधिक काम त्यांनी पूर्ण केले. परंतु हाती सोपवलेली मोहिम फत्ते करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला महात्मा गांधी यांच्यावरील एका ट्विटचा विपर्यास करून महापालिकेतून बाजुला करण्यात आले.

याशिवाय पल्लवी दराडे यांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून घनकचरा विभागात योग्यप्रकारे लक्ष घालत असतानाच, त्यांच्याकडील प्रकल्पांची कामे काढून घेत अविश्वास दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडील एकेक विभागाची जबाबदारी कमी करत त्यांना बाजुला करण्याचे काम केले गेले. त्यामुळे अखेर या अपमानास्पद वागणुकीमुळे खुद्द दराडे यांना महापालिकेत राहण्याची इच्छा राहिली नाही. त्यातच त्यांची बदली झाली. परंतु त्यापूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेच्या प्रकल्प विभागाची जबाबदारी आय.ए. कुंदन यांच्याऐवजी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. कुंदन या महापालिकेत वरिष्ठ असताना नव्याने नियुक्ती झालेल्या प्रवीण दराडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवत एकप्रकारे आयुक्तांनी कुंदन यांच्यावर अविश्वास दाखवला होता.

First Published on: May 9, 2020 5:24 PM
Exit mobile version