मुंबई ते शिर्डी पायी जाणार्‍या भाविकांना विमाकवच

मुंबई ते शिर्डी पायी जाणार्‍या भाविकांना विमाकवच

गेल्यावर्षी शिर्डीला चालत जाणार्‍या काही भाविकांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे पायी जाणार्‍या साईभक्तांना विमाकवच मिळावे, ही मागणी जोर धरू लागली होती. ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने शिर्डीला पायी जाणार्‍या साईभक्तांना विमाचे संरक्षण देण्यास तयार झाली आहे. त्यानुसार, शिर्डीला पायी जाणार्‍या भाविकाचा अपघातात मृत्यू झालातर त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे इन्शुरन्स मिळणार आहे, असे कंपनीचे उपप्रबंधक सचिन खानविलकर यांनी सांगितले.

मुंबईत अनेक साईभक्त मंडळे आहेत. तसेच साई देवस्थानेही आहेत. ही मंडळे आणि देवस्थानांकडून दरवर्षी मुंबई ते शिर्डी अशी पदयात्रा काढण्यात येते. काही मंडळे तर पालखी घेऊन शिर्डीला जातात. शिर्डीला पायी जाताना दिंडीत कार, टेम्पो शिरून अपघात होणे, पायी जाणार्‍या साईभक्तांना उडवणे असे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे शिर्डीला पायी जाणार्‍या भक्तांना विमाकवच मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून साईभक्तांकडून होत होती.अखेर ही मागणी मान्य झाली आहे. ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने साईभक्तांचा विमा उतरवण्यास मान्यता दिली आहे.

या पॉलिसीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या साईभक्तांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा मिळणार आहे. तर, दोन अवयव किंवा दोने डोळे गमावल्यास ५ लाखांपर्यंतची मदत मिळणार आहे. एक हात, एक डोळा, एक पाय गमावल्यास अडीच लाखांपर्यंतची मदत मिळू शकेल. कायमस्वरुपी अपंगत्व येणार्‍या भाविकाला पाच लाख, अपघात झालेल्या व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये होणार्‍या उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये या विमाकवच अंतर्गत देण्यात येणार आहे.

साईभक्तांना विमा मिळवा, अशी मागणी सातत्याने होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही त्यासाठी पाठपुरावा करत होतो. अखेर आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. मुंबई ते शिर्डी चालत प्रवास करणार्‍या भाविकांसाठी ही खूशखबर असल्याचेही खानविलकर यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: January 1, 2020 5:33 AM
Exit mobile version