होय, आम्ही कमी पडलो; पण आता पक्ष बांधायचाय – बाळा नांदगावकर

होय, आम्ही कमी पडलो; पण आता पक्ष बांधायचाय – बाळा नांदगावकर

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात आधी शिवसेनेची भाजपशी तुटलेली युती आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जुळवून आणलेली महाविकासआघाडी याच गोष्टींची चर्चा होती. मात्र या सगळ्या चर्चेतून एक पक्ष आणि नेता बाजूलाच होता. तो म्हणजे मनसे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे. आधी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय आणि त्यानंतर अगदी ऐनवेळी घेतलेला विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय यामुळे राज ठाकरेंच्या धरसोड वृत्तीची बरीच चर्चा झाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त १ आमदार निवडून आला. त्यामुळे राज ठाकरेंनी भूमिकेत अमूलाग्र बदल करून पक्षाला नवी उभारी द्यायला हवी अशी अपेक्षा पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्यही व्यक्त करत होते. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २३ तारखेला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे पक्षाचा नवीन ‘भगवा’ झेंडा सादर करतील आणि तशीच नवीन भूमिका देखील मांडतील असं बोललं जात आहे. त्यामुळे नक्की राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय? मनसेची नवी भूमिका कशी असेल? आत्तापर्यंतच्या प्रवासात मनसेचं काय आणि कुठे चुकलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘माय महानगर’ने खुल्लम खुल्ला चर्चेमध्ये मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना आमंत्रित केलं होतं. या रोखठोक मुलाखतीत त्यांनी देखील रोखठोक भूमिका मांडली.

…नांदगावकरांनी चूक मान्य केली!

‘सुरुवातीला राज ठाकरेंनी निर्णय घेतला होता की दुसर्‍या पक्षातले कार्यकर्ते, नेते फोडायचे नाहीत. जो तरुण आला, तो फ्रेश होता. पण त्यांना योग्य दिशा देण्यात आम्ही कमी पडलो. राजकीय घडामोडी समजून घेण्याची राजकीय परिपक्वता त्यांच्यामध्ये नव्हती. त्या युवाला जे द्यायला हवं होतं, ते देण्यात आम्ही कमी पडलो’, असं नांदगावकरांनी सांगितलं. ‘१३ आमदार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता. पण ते झालं नाही. लोकांना जेवढा वेळ द्यायला हवा होता, तो देऊ शकलो नाही. माझ्यासहित आम्ही कमी पडलो. लोकाभिमुख व्हायला हवं होतं. पण त्यात कमी पडलो. त्यामुळे संघटन उभं राहाणं आवश्यक होतं, ते संघटन उभं राहू शकलं नाही. पण आता आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे. ते झाल्यावर इतरांना आम्हाला सोबत घ्यावंसं स्वत:हून वाटेल. आम्ही मेहनत करतोय. कधीतरी यश येईलच. कधीतरी लोकांनाही मनसेच्या ब्लू प्रिंटची, अजेंड्याचं महत्व कळेल’, असंही त्यांनी नमूद केलं.’आमच्या महिला आघाडी समर्थ होत्या. पण आम्ही त्यात खूपच कमी पडलो. विद्यार्थी सेनेमध्ये देखील आम्ही कमी पडलो. आजही राज ठाकरेंच्या सभांना, कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात महिला येतात’, असं देखील त्यांनी नमूद केलं.

नवा झेंडा, नवी दिशा?

यावेळी बाळा नांदगावकरांनी मनसेच्या नव्या झेंड्याविषयी आणि नव्या भूमिकेविषयी भूमिका मांडली. ‘आमचा पहिला झेंडा म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जायचं या विचाराचं प्रतीक होतं. तेव्हा कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा होती. पण सध्याच्या धरसोडीच्या राजकारणामध्ये काहीतरी बदल केला, तर फायदा होईल असं आम्हाला वाटलं. कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देऊन बाहेर पडायचं. त्यामुळे २३ तारखेला त्यांचा हा प्रयत्न नक्कीच असेल. शिवाजी महाराजांना राज ठाकरेंनी आपलं आदर्श मानलं आहे. त्यांच्याप्रमाणे सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जायची ही भूमिका असेल’, असं नांदगावकर म्हणाले. मात्र, भाजपसोबत अजून गेलो नाही, असं ते म्हणाले. ‘भाजपसोबत युतीच्या फक्त माध्यमांमध्ये चर्चा आहेत. माध्यमांचं कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर आणणं. पण मग आम्ही भेटायचं नाही का? चर्चाही करायची नाही का? त्यातून जर काही घडलं, तर त्यात वाईट काय? पण भाजपसोबत अजून युती झालेलीच नाही. ती फक्त माध्यमांमध्ये चर्चा आहे’, असं त्यांनी नमूद केलं.

नितीन नांदगावकरांवर समजावलं होतं…

दरम्यान, नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडण्यावरही बाळा नांदगावर यावेळी खुलेपणाने बोलले.‘नितीन माझा पुतण्याच आहे. त्याला विक्रोळीतून निवडणूक लढवायची होती. मी स्वत: त्याला विचारलं. तिथल्या विभागाध्यक्षांनी देखील नितीनचं नाव सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही नितीनचं नाव ओके केलं. त्यांनी नितीन नांदगावकरांना विचारलं. पण तो म्हणाला, निवडणूक मी लढेन, पण खर्च तुम्हाला करावा लागेल. तेव्हा आम्ही सांगितलं, आमच्याकडून जेवढं जमेल, ते करू, पण बाकीचं तुम्हाला करावं लागेल. त्याची नाराजी असेल. परळमध्ये वाहतूक सेनेचं ऑफिस सुरू केलं. पण तिथे त्याने जनता दरबार सुरू केला. कुणालाही मारायचं आणि त्याचं लाईव्ह करायचं ही कुठली पद्धत? आम्ही यांच्यापेक्षा दहापटीनं केलं. पण ते असं दाखवलं नाही. त्यावरून तो रेकॉर्डवर आला. त्याला तडीपारीची नोटीस आली. त्यामुळे त्याच्यावर अन्याय करण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला फ्रीहँड दिला होता’, असं ते म्हणाले.

शिवसेनेला शह देण्यासाठी हिंदुत्व?

‘शिवसेना देखील आधी मराठीच्या मुद्द्यावर होती. बाबरी मशीद पडल्यानंतर त्यांना हिंदुत्व स्वीकारलं. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या मुद्द्यावरच ही व्यापक भूमिका स्वीकारली आहे. मराठीचा मुद्दा आहेच आणि तसंही, मराठी मतांवर कुणाची मक्तेदारी नाही. प्रत्येक पक्षाचा मतदार ठरलेला आहे. सगळ्यांनाच मराठी माणसाची मतं जातात. पण तसं असेल, तर लालबाग-परळमध्ये २००९मध्ये मी निवडून आलोच. तो शिवसेनेचा मतदार होता’, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

टीका मोदींवर होती, भाजपवर नाही…

दरम्यान, यावेळी भाजपसोबत जाण्याविषयी नांदगावकरांनी राज ठाकरेंची पाठराखण केली. ‘मोदींकडून विकासाबाबत भ्रमनिरास झाला, म्हणून राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. पण तेव्हाही त्यांनी मोदी आणि शहांवर टीका केली होती. भाजपवर त्यांनी कधीच टीका केली नाही’, असं नांदगावकरांनी नमूद केलं.

अमितसारख्या तरुणांनी राजकारणात यायला हवं..

येत्या २३ तारखेला अमित ठाकरे यांचं राजकीय पदार्पण होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, ‘अमितसारख्या तरुणांनी स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी. प्रस्थापितांनी कितीही विरोध केला, तरी हे तरुण पुढे येणारच. अमित ठाकरे उत्तम प्रकारे आकलनाचं काम करतोय. तीही राजकारण्याची खासियत आहे. बैठका, दौर्‍यांना देखील तो असतो. नेत्याचे गुण त्याचे आहेत. शेवटी खाण तशी माती’.

विद्यमान सरकार किती काळ टिकेल?

सध्याचं महाविकासआघाडीचं सरकार दीड वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही, असं नांदगावकर म्हणाले. ‘शिवसेनेनं भाजपसोबत जे केलं, ते योग्यच होतं. पण बाळासाहेबांना इच्छा होती की आपलं सरकार यावं. मात्र ते जर इतरांच्या मदतीशिवाय आलं असतं, तर त्याचा अभिमान वाटला असता. पण दुर्दैवाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आणलं. पण ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री झाला, याचा नक्कीच मला आनंद आहे. ५ वर्ष सरकार चाललं तर आम्हाला आनंदच आहे. पण वर्ष-दीड वर्षापेक्षा जास्त वेळ मला काही वाटत नाही. उद्धव ठाकरे खमके आहेत. तुम्ही त्यांच्यावर जर कशाची जबरदस्ती केली, तर ते ऐकून घेत नाहीत. त्यामुळे ते इतर मित्रपक्षांना ऐकणार नाहीत’, असं त्यांनी नमूद केलं.

First Published on: January 11, 2020 3:51 AM
Exit mobile version