अर्थसंकल्प कळू लागताच गुंतवणूकदार निराश

अर्थसंकल्प कळू लागताच गुंतवणूकदार निराश

शुक्रवारी संसदेत मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. अर्थसंकल्प मांडला जात असताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ४०० अंकांनी वधारला होता. मात्र जसजसा अर्थसंकल्प गुंतवणूकारांना कळू लागला तशी विक्री सुरू होत निर्देशांकातील वाढ कमी झाली. अर्थसंकल्पात एलटीसीजी कराचा कोणताही उल्लेख नाही. तसेच पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी करात सूट दिली असली तरी ही आयकराच्या खास कलमांतर्गत देण्यात आलेली आहे. मात्र पुढील स्लॅब तसेच ठेवले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार निराशा झाले. तरीही निर्देशांक २१२.७४ अंकांनी वधारत शेअर बाजाराचे कामकाज बंद झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, सेन्सेक्समध्ये २१२.७४ अंकांची (०.५९ टक्के) वाढ होऊन तो ३६,४६९.४३ अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ६२.७० अंकांची (०.५८ टक्के) वाढ होऊन तो १०,८९३.६५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने ३६,७७८.१४ अंकांचा कमाल तर ३६,२२१.३२ अंकांची किमान मर्यादा गाठली. तर निफ्टीने १०,९८३.४५ अंकांची कमाल तर १०,८१३.४५ अंकांची किमान मर्यादा गाठली होती.

मुंबई शेअर बाजारात हिरोमोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये ७.४८ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर मारुतीच्या शेअर्समध्ये ४.९६ टक्के, एचसीएलटेकमध्ये ३.८६ टक्के, एशियन पेंटमध्ये ३.१४ टक्के तर बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये २.२३ टक्क्यांची तेजी दिसून आली. दुसर्‍या बाजूला वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये १७.८२ टक्के, यस बँक ४.४५ टक्के, एसबीआयमध्ये ३.०९ टक्के, आयसीआयसीआय बँक २.६८ टक्के आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये ०.९१ टक्क्यांची घसरण झाली होती.

राष्ट्रीय शेअर बाजारात हिरोमोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये ७.५४ टक्क्यांची वाढ झाली. मारुती ४.३५ टक्के, एचसीएलटेक ३.६२ टक्के, आयशर मोटर्स ३.६० टक्के आणि डॉ. रेड्डी कंपनीच्या शेअर्समध्ये ३.३२ टक्क्यांची तेजी दिसून आली. तर वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये १८.१२ टक्के घसरण झाली. त्याशिवाय यस बँक ४.५३ टक्के, एसबीआय ३.७६ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये ३.०५ टक्क्यांची घसरण झाली होती.

राष्ट्रीय शेअर बाजारात मीडिया, मेटल, सरकारी बँकांचे निर्देशांकात ३ टक्क्यांची घसरण झाली. मीडिया निर्देशांकात मीडियाचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत खाली आले. दुसर्‍या बाजूला सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. त्याशिवाय खाजगी बँक निर्देशांक तीन चतुर्थांश टक्के खाली आला.

निफ्टी ऑटो निर्देशांकाने २.७५ टक्क्यांनी वधारला. फार्मा निर्देशांक १.५, आयटी, रिअ‍ॅलिटी आणि एफएमसीजी निर्देशांक १ टक्क्याने वाढला. ऑटो निर्देशांकावर फक्त एमआरएफ आणि मदरसन सुमी या कंपनीचे शेअर्स कोसळले. मात्र सर्व रिअ‍ॅलिटी शेअर्सच्या किमतीत वाढ झाली होती.

First Published on: February 2, 2019 5:25 AM
Exit mobile version