सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमारांच्या शपथविधीला महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना निमंत्रण

सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमारांच्या शपथविधीला महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना निमंत्रण

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांडकडून अखेर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे. पाच दिवसांच्या विचारमंथनानंतर कर्नाटकसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला आणि नव्या सरकारचा शपथविधी 20मे रोजी होणार आहे. या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह देशातील इतर नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांच्या पुढे झेप घेत काँग्रेसने 136 जागा जिंकल्या, तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर मुख्यमंत्री कोण याचा तिढा सुटायला पाच दिवसांचा वेळ लागला. अखेर काँग्रेसकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिद्धरामय्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

काँग्रेसच्या सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी सत्ता परिवर्तनासाठी कंबर कसली असल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चुरस सुरू होती. सिद्धरामय्या हे कर्नाटक राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते मानले जातात. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीत ओबीसींची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसकडे सिद्धरामय्या यांच्यापेक्षा चांगला चेहरा नसल्यामुळे सिद्धरामैय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडली.

सिद्धरामय्या यांचा 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बंगळुरू येथे शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, सीताराम येचुरी, सीपीआय (मार्क्सवादी) सरचिटणीस, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिनेता आणि MNM प्रमुख कमल हासन यांना निमंत्रण देण्यात आले आहे, तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.

First Published on: May 18, 2023 10:11 PM
Exit mobile version