‘सारथी’ प्रकरणाची चौकशी होणार; किशोरराजे निंबाळकरांकडे अतिरिक्त भार

‘सारथी’ प्रकरणाची चौकशी होणार; किशोरराजे निंबाळकरांकडे अतिरिक्त भार

मराठा समाजातील तरूणांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रिशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’मधून इतर मागासवर्ग विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता यांची अखेर बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. सरकारने सारथीची अतिरिक्त जबाबदारी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे दिली आहे. सारथीतीत अनियमितता असल्याच्या आरोपांची चौकशीही निंबाळकर यांच्याकडून केली जाईल. सारथी संस्थेची स्वयत्तता कायम ठेवावी, या मागणीसाठी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या तरूणांनी शनिवारी पुण्यात लाक्षणिक उपोषण केले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन सारथीची स्वायत्तता कायम ठेवण्याचे तसेच गुप्ता यांना पदावरून हटविण्याचे आश्वासन दिले होते.

सामान्य प्रशासन विभागाने गुप्ता यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी निंबाकर यांची नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील नियुक्तीचे पत्र निंबाळकर यांना दिले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पुढील आदेश होईपर्यंत आपल्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर भाजप सरकारने मराठा समाजातील तरूणांसाठी बार्टीच्या धर्तीवर सारथीची स्थापना केली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी संस्थेवर सरकारकडून निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली. हे निर्बंध उठवण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. सारथीची स्वायत्तता अबाधित ठेवण्याबरोबरच गुप्ता यांना पदावरून हटवण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. गुप्ता यांनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचे तसेच सर्व आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानुसार सरकारने कार्यवाही सुरू केली आहे.

First Published on: January 15, 2020 11:01 PM
Exit mobile version