केडीएमसीच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानात घोटाळा?

केडीएमसीच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानात घोटाळा?

कल्याण-डोंबिवली महापालिका

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र शिक्षकांनी परस्पर बँकेतून अनुदानाची रक्कम काढून लाटल्याचा प्रकार कल्याणमध्ये उजेडात आला आहे. कल्याणमध्ये एनजीओ चालवणाऱ्या डॉ. रूपींदर कौर यांनी हा सगळा प्रकार समोर आणला असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या घोटाळेबाज शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी कौर यांनी केली आहे.

शिक्षकांवर घोटाळ्याचा आरोप

कल्याणमधील वाडेघर परिसरात आदिवासी पाडा आहे. या पाड्यावरचे विद्यार्थी जवळच असलेल्या केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ४७ मध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, पुस्तकं, बूट आणि रेनकोट यासाठी शासनातर्फे अनुदान मिळतं. आधी पालकांनी खरेदी करायची आणि त्याचे पैसे अनुदानाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात अशी ही योजना होती. मात्र आदिवासी पाड्यावरील काही पालकांची आधी खर्च करण्याची ऐपत नसल्यानं, शाळेच्या मुख्याध्यापकांनी एक दुकानदार पकडला आणि कुठलीही अधिकृत परवानगी नसताना त्याच्याकडून या विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी केली. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये या विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले. मात्र शिक्षकांनी ते परस्पर काढून दुकानदाराला देऊन टाकले. मात्र या सगळ्यात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पुरेसं साहित्य न देताच पूर्णच्या पूर्ण पैसे काढून दुकानदाराच्या खिशात घातल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला मिळाली पोलीस वसाहतीची सनद


बँक अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

शाळेनं विद्यार्थ्यांची खाती उघडून देताना ती राष्ट्रीयीकृत बँकेत उघडणे गरजेचे आहे. मात्र ती खाती अपना बँक या को. ऑपरेटिव्ह बँकेत उघडली आहेत. तसेच नियमानुसार ही झिरो बॅलन्स अकाऊंट्स असतानाही पालकांकडून १००-१०० रुपये घेऊन बँकेत भरण्यात आले. त्याहीपुढे जाऊन ज्यावेळी बँकेतून पैसे काढायची वेळ आली, त्यावेळी या अल्पवयीन विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित असणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र शिक्षकांनी हे पैसे काढून दुकानदाराला दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांना हा अधिकार दिला कुणी? आणि एरव्ही नियम शिकवणाऱ्या बँकेच्या तरी नियमात ही गोष्ट कशी बसली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्याऐवजी पत्रकारांवरच दबाव टाकायचा प्रयत्न करीत बोलण्यास नकार दर्शविला.

शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया थक्क करणारी

या प्रकाराबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे शिक्षणाधिकारी जे. जे. तडवी यांना विचारलं असता त्यांची उत्तरंही थक्क करणारी होती. शिक्षकांनी पैसे लाटले हा पालकांचा गैरसमज असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. पण पूर्ण साहित्य न देता पूर्ण पैसे देणं आणि बँकेतून हे पैसे परस्पर काढणं हे नियमात आहे का? यावर मात्र त्यांची बोलती बंद झाली.

मुलांबरोबर बँकेत एकदाच खाते उघडण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर बँकेत कधीच गेलो नाही. बँकेत खात्यावर पैसे आले हे माहीत सुद्धा नाही. मुलांना पूर्ण साहित्य मिळालेले नाही.
संगीता दोरे, पालक

First Published on: August 9, 2019 7:29 PM
Exit mobile version