बाळासह बाहेर काढला ९ किलोचा ट्युमर; जे. जे. रुग्णालयाधील यशस्वी शस्त्रक्रिया

बाळासह बाहेर काढला ९ किलोचा ट्युमर; जे. जे. रुग्णालयाधील यशस्वी शस्त्रक्रिया

बाळासह बाहेर काढला ९ किलोचा ट्युमर

९ महिन्यांचं बाळ आणि त्यासोबत ९ किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीपणे महिलेच्या पोटातून बाहेर काढण्यास जे.जे हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलं आहे. गर्भवती महिलांमध्ये अशा अडथळ्यांमधून प्रससूती करणे खूप दुर्मिळ असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. यामध्ये बाळ आणि आई दोघे ही सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

जे. जे हॉस्पिटलमधील यशस्वी शस्त्रक्रिया

पालघरच्या विक्रमगडमधील २५ वर्षीय गर्भवती महिला प्रसूतीसाठी जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. पण, ही शस्त्रक्रिया कशी करायची? असा प्रश्न डॉक्टरांपुढे होता. कारण, बाळासह ९ किलोचा ट्यूमर बाहेर काढून महिलेची यशस्वी प्रसूती करायची होती. त्यात तिचं हिमोग्लोबिन देखील कमी झाल होते. पोट जास्त असल्याने तिला श्वास देखील घ्यायला त्रास होता. त्यामुळे आधी तिची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर, योग्य तपासण्या केल्यानंतर आधी सिझेरियन करुन महिलेची प्रसूती केली आणि नंतर ९ किलोचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला आहे.

ही महिला साडे आठ महिन्यांची गर्भवती होती तेव्हा इथे चेकअपसाठी आली होती. तेव्हा आम्ही तिला त्या बाळाची वाढ होऊ दे असे सांगण्यात आले. त्यानंतर गर्भ पूर्ण तयार झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करुन घेतलं आणि तिची शस्त्रक्रिया केली. पोट खूप मोठं झालं होतं. त्यामुळे तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ही शस्त्रक्रिया करुन बाळानंतर जेव्हा ट्यूमर बाहेर काढला तेव्हा तिच्या पोटात एकूण १२.५ किलो एवढं वजन होतं. एकूण ९ किलोचा आणि २.५ किलोचं बाळ एवढं वजन तिच्या पोटात होतं.  – डॉ. राजश्री कटके, जे.जे. हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ

पोट मोठं असल्याकारणाने श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. पालघरमध्ये अनेक ठिकाणी दाखवलं पण, तिकडे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून त्यांनी जे.जे. रुग्णालयात पाठवलं. शिवाय, मला याआधीही दोन जुळी मुलं आहेत त्यामुळे मला वाटलं की पुन्हा तसंच काहीसं असेल. पण, जेव्हा कळलं की पोटात मोठी गाठ आहे तेव्हा कळतंच नव्हतं काय करु ते. पण, आता चांगलं वाटतंय असं महिलेने सांगितलं आहे.


वाचा – पित्ताशयामध्ये १ फूट २ इंचाची गाठ! वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया


 

First Published on: January 8, 2019 4:08 PM
Exit mobile version