जे.जे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अडकले लालफितीत

जे.जे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अडकले लालफितीत

जे.जे. हॉस्पिटल

रुग्णांना एकाच इमारतीमध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. वर्षभरापूर्वीच जे.जे. हॉस्पिटलमधील जुनी इमारत पाडून ती जागा या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु हॉस्पिटल उभारणीसंदर्भातील निविदा काढण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे या हॉस्पिटलच्या उभारणीची प्रक्रिया लालफितीच्या कारभारात अडकल्याने 201८-1९ या आर्थिक वर्षात तरी या इमारतीच्या उभारणीसाठी मुहूर्त सापडणे कठीण बनले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलसाठी मंजूर निधी आर्थिक वर्ष संपल्यानंतर परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईमधील रुग्णांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलच्या धर्तीवर अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय गतवर्षी राज्य सरकारने घेतला. त्यासाठी जे.जे. हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेली बालरुग्ण विभागाची इमारत पाडण्यात आली. तसेच तिच्या समोरील जागाही मोकळी करण्यात आली. इमारत पाडण्याचे काम तातडीने करण्यात आले. मात्र इमारत पाडून वर्ष उलटले तरी तेथे अद्याप काम सुरू झालेले नाही. सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल चार वर्षांमध्ये उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हॉस्पिटल उभारण्यासाठी 700 कोटींचा निधीही राज्य सरकारने मंजूर केला. पहिल्या वर्षातील कामासाठी सरकारने 10 कोटींचा निधीही तातडीने उपलब्ध केला. परंतु वर्ष उलटले तरी मोकळ्या केलेल्या जागेवर अद्याप एक वीट रचण्यात आलेली नाही. त्यामुळे मंजूर निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात आजपर्यंत अनेक बैठका झाल्या असल्यातरी सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठीच्या मंजुरीला सूंपर्ण वर्ष लागले आहे. नुकतेच 15 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या बैठकीमध्ये निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली असली तरी अद्याप निविदा प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात देण्यात आलेली नाही (अद्याप निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही.) निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी किमान तीन महिने लागत असल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये हे काम सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे. काम सुरू न झाल्यास मंजूर निधी परत जाण्याची शक्यता असल्याने मार्चपर्यंत हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी निविदा प्रक्रियेच्या विलंबामुळे चालू आर्थिक वर्षात हॉस्पिटलच्या कामाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळणे आता कठीण होऊन बसले आहे. हॉस्पिटलसाठी मंजूर झालेला निधी परत गेल्यास पुढील वर्षामध्ये हॉस्पिटलच्या उभारणीसाठी अधिक निधी मिळवण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

निविदा प्रक्रियेचे काम पीडब्ल्यूडीकडे सोपवलेले असून, त्यासंदर्भात ते व्यवस्थित काम करत आहेत. जानेवारीत निविदा प्रक्रियेला सुरुवात होऊन मार्चपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

15 डिसेंबरला झालेल्या बैठकीमध्ये निविदा काढण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आम्ही निविदा प्रक्रियेच्या कामाला सुरुवात केली आहे. लवकरच आम्ही जाहिरात काढून निविदा प्रक्रिया राबवू.
– आकाश चकोर, उपअभियंता, पीडब्ल्यूडी

First Published on: January 2, 2019 4:12 AM
Exit mobile version