जे.जे हॉस्पिटल आता आणखी स्वच्छ

जे.जे हॉस्पिटल आता आणखी स्वच्छ

जे.जे. हॉस्पिटल

जे.जे हॉस्पिटलमध्ये फक्त मुंबईतूनच नाही तर देशभरातून रूग्ण येत असतात. दररोज चार ते पाच हजार बाह्यरूग्ण विभागात रूग्ण येतात. तर, बाराशे ते दीड हजार रूग्ण दाखल होऊन उपचार घेत असतात. पण, हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या स्वच्छतेमुळे निरोगी राहता येत याचे ज्ञान नसल्याकारणाने अनेक जण हॉस्पिटलच्या आवारात कचरा टाकतात. या परिसरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे नियोजन करण्यासाठी १८० कचरा पेट्यांचे दान करण्यात आले आहे. त्यामुळे आता हॉस्पिटलचा आधार स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उपरोक्त रूग्णांच्या संख्येत रूग्णांच्या नातेवाईकांची देखील भर असते. एका रूग्णामागे किमान चार नातेवाईक असे दररोज येणार्‍यांची संख्या वीस हजारांपेक्षा जास्त असते. रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारा कचरा, हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन विभागाबाहेरील बाग, प्रतीक्षालय, शस्रक्रिया विभागाबाहेरील मोकळी जागा, आपत्कालीन विभागाबाहेरील कॉरीडोअर या भागात सतत कचरा निर्माण होत असतो.

नुकत्याच पार पडलेल्या जे.जे हॉस्पिटलच्या समाजसेवा विभागातील कार्यक्रमाअंतर्गत एका इन्शुरन्स कंपनीकडून स्त्री मुक्ती संघटनेच्या माध्यमातून १८० कचरापेट्या देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत. जे.जे मध्ये येणार्‍या रूग्णांची संख्याही अधिक असल्याने त्याच तुलनेत कचरा निर्माण होतो. नेहमीच सतावणार्‍या या त्रासाला दूर करण्यासाठी जे.जे प्रशासनाने लोकसहभागाने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदेनवाले यांनी सांगितले. या कचरा निर्मूलनाच्या प्रक्रियेद्वारे भविष्यात हॉस्पिटल स्वच्छ आणि सुदृढ करण्यासाठी बायोगॅस प्लांट असे उपक्रम राबवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

डायलिसिस उपकरणेही दाखल
ट्रेंड सेंटर्स या संस्थेमार्फत जे जे हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागाला डायलिसिससाठी आवश्यक असणारी उपकरणे दान करण्यात आली आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना यांचा फायदा होणार आहे.

First Published on: April 1, 2019 5:45 AM
Exit mobile version