जागतिक पर्यावरण दिन – प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांवर जे.जे. हॉस्पिटलचा पुढाकार

जागतिक पर्यावरण दिन – प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांवर जे.जे. हॉस्पिटलचा पुढाकार

गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या जात असून विविध शासकीय आणि अशासकीय संस्था पर्यावरणपूरक बदलांसाठी प्रयत्नशील आहेत. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे.जे. हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण सकारात्मक निर्णय घेतला आहे. यात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी जे.जे. हॉस्पिटलसह सामंजस्य करार करण्यात आला आहे.

तब्बल ९२ लाख निधी देणगी स्वरूपात

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर्षी वायू प्रदूषण आणि आवाज प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांवर अभ्यास करण्यासाठी जे.जे हॉस्पिटलमधील कान नाक घसा विभागाला तब्बल ९२ लाख रुपयांचा निधी देणगी स्वरूपात दिला आहे.

वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांत वाढ

या माध्यमातून वायू आणि ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांवर संशोधन करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत अन्य प्रदूषणांसह सर्वाधिक वायू आणि ध्वनिप्रदूषणही वाढतेय. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन या समस्येशी निगडित रुग्ण वाढलेत का? त्यांना नेमका कशा स्वरूपाचा त्रास होतो? कारणे व परिणाम कोणते? या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आता जे.जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरही लहान मुलांमध्ये वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांत वाढ झाली असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे.

या संघटनेच्या माहितीनुसार, लहान मुलांना दूषित हवेमुळे श्वसनाचे विकारही जडतात ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे.याविषयी अधिक माहिती देताना जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की,” हा करार ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. या देणगीच्या माध्यमातून संशोधनासाठी उपयुक्त असणारे अद्ययावत तंत्रज्ञान घेणार आहोत. त्यानंतर लवकरच या विषयावर काम सुरू केलं जाईल. “

First Published on: June 5, 2019 8:17 AM
Exit mobile version