डोंबिवली क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकवरील गवत हटेना

डोंबिवली क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकवरील गवत हटेना

डोंबिवली क्रीडासंकुलातील जॉगिंग ट्रकवर गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, त्याकडे पालिका अधिकार्‍यांचे लक्ष वेधूनही त्यांच्याकडून कानाडोळा केल्याने मनसे आक्रमक झाली आहे. दोन दिवसांत गवत आणि झाडे झुडपे न काढल्यास पालिका अधिकार्‍यांना त्याच गवताचा बुके देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेचे हभप सावळाराम महाराज हे एकमेव भव्य क्रीडासंकुल आहे. संकुलातील सुविधांअभावी मुलांना अनेक अडचणी येत असतात. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी या हेतूने क्रीडासंकूल खुले करण्यात आले आले आहे. क्रीडासंकुलावर फुटबॉल बॅडमिंटन स्विमींग, अ‍ॅथलेटिक्स आदी क्रीडाप्रकार सुरू आहेत. अनेक खेळाडू हे राज्य व राष्ट्रीय पातळीवर डोंबिवलीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, अपुर्‍या सुविधांचा त्रास खेळाडूंना होत आहे. क्रीडासंकुलात जॉगिंग ट्रक असल्याने सकाळच्यावेळी क्रीडासंकूलात खूपच गर्दी असते.

मात्र जॉगिंग ट्रक व मैदानाच्या आजुबाजूला प्रचंड गवत व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे त्याचाही त्रास खेळाडूंना सहन करावा लागतो मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, अजूनही झुडप गवत कापण्यात आलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच कल्याण वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बस डेपो भागात वाढलेले गवत, झुडपे खुरटी झाडे पालिकेने त्वरित कापून डेपो स्वच्छ केला. मग क्रीडा संकुलात स्वच्छ करण्यास कानाडोळा का केला जात आहे? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. हा पालिकेच्या वास्तू, मालमत्ता, खेळाची मैदाने यांची निगा राखावी व करदात्या नागरिकांच्या कररूपी पैशांचे नाहक होणारे नुकसान टाळावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

First Published on: November 12, 2019 1:32 AM
Exit mobile version