पत्रकारांवर राजकीय पक्षाचा शिक्का लागला की पत्रकारिता संपते – उद्धव ठाकरे

पत्रकारांवर राजकीय पक्षाचा शिक्का लागला की पत्रकारिता संपते – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पत्रकारांना पुरस्कार वितरण

राजकारण आणि पत्रकारिता यांचे नाते जुने आहे. पत्रकार हे नेहमी अनुभव घेऊन सडेतोड लिहीत असतात. पत्रकारितेमध्ये निष्पक्षपणा आवश्यक आहे. निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणाची समीक्षा करत त्याला योग्य दिशा देण्याबरोबरच राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारितेने यापुढील काळातही योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत केले. यावेळी दैनिक लोकमतचे दिनकर रायकर यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर लोकसत्ताचे संजय बापट यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर इलेक्ट्रानिक माध्यमांसाठी दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी तर दै.तरुण भारतच्या जानव्ही पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, रायकर यांचे पत्रकारितेमधील योगदान फार मोठे आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून काम करताना त्यांनी राजकारणासह समाजातील विविध घटकांचे अनेक पैलू अनुभवले. आजच्या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान झाला आहे. मीही लहानपणापासून घरातच पत्रकारिता अनुभवत आणि शिकत आलो आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दैनिक सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या काळात पत्रकारीता जवळून अनुभवता आली. पत्रकार हा कोणत्याही परिस्थितीत निष्पक्षच असला पाहीजे. त्याच्यावर एखाद्या पक्षाचा शिक्का बसला की त्याची पत्रकारिता तेथेच संपते. निष्पक्षता जपत पत्रकारांनी पत्रकारिता करणे आवश्यक आहे. रायकर आणि पुरस्कारप्राप्त इतर पत्रकारांनी अशीच निष्पक्ष आणि आदर्श पत्रकारिता करुन पत्रकारितेचा गौरव वाढविला, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आदी प्रश्नांवरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विचार मांडले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा कर्जमुक्ती हा काही कायमस्वरुपी इलाज नाही. हा फक्त एक प्रथमोपचार आहे. पण असे विविध मार्ग अवलंबून आमचे सरकार शेतकऱ्यांना अडचणीतून निश्चित बाहेर काढेल. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. याबाबत प्रशासनाला आज पुन्हा सक्त सूचना दिल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींवर जलदगतीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पाढंरपट्टे, संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यावाह अनिकेत जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 5, 2020 10:56 PM
Exit mobile version