आधारवाडी जेलमधून पळलेला आरोपी गजाआड

आधारवाडी जेलमधून पळलेला आरोपी गजाआड

कल्याणच्या आधारवाडी जेलमधून फरार झालेला राजेंद्र आजीनाथ जाधव (वय 39) या आरोपीला अवघ्या २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.आरोपी राजेंद्र हा रेकॉर्डवरील चोर आहे. रिक्षा चोरीच्या प्रकरणात कल्याण न्यायालयाने 2 वर्षे शिक्षा सुनावली असून सध्या तो आधारवाडी जेलमध्ये बंदिवान आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास राजेंद्र हा जेलमधून फरार झाला होता. त्यामुळे जेल प्रशासनात खळबळ उडाली होती. पोलीसांची वेगवेगळी टीम त्याचा शोध घेत होती. मात्र अवघ्या 24 तासात त्याला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात यश आले आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास राजेंद्र हा बदलापूर पाईप लाईन रोड कोळेगाव सर्कल येथे येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर-संजू जॉन यांना एका बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक-नितीन मुदगुण, पो.हवालदार विलास मालशेट्ये, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप, अजित राजपूत,प्रकाश पाटील असे एक पथक तयार करून सदर ठिकाणी सापळा लावला होता.
राजेंद्र त्याठिकाणी येताच, पोलीस असल्याचा संशय आल्यानंतर तो तेथून पळू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. राजेंद्र हा डोंबिवली कोळगाव येथे राहत असून, त्याच्यावर टिळक नगर पोलीस ठाणे आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. राजेंद्र याला कल्याणच्या खडकपाडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

First Published on: July 27, 2019 4:00 AM
Exit mobile version