आज सकाळी ९.४५ ते १.४५ कल्याण – डोंबिवली मेगाब्लॉक

आज सकाळी ९.४५ ते १.४५ कल्याण – डोंबिवली मेगाब्लॉक

एक्स्प्रेस

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बुधवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ पर्यंत असा पाच तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.त्यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार आहे. मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे १६ मेल आणि एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन नाताळच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रशासनाच्यावतीने ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे ४०० मेट्रिक टन वजनाचे, सहा मीटर रुंदीचे चार गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण – डोंबिवली स्थानकादरम्यानची रेल्वे वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार आहे. जलद धीम्या तसेच पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणार्‍या आठ तर कल्याणच्या दिशेने जाणार्‍या आठ लांब पल्ल्याच्या गाडयांना फटका बसणार आहे.

परिणामी नाताळासाठी घराबाहेर पडणार्‍या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच लोकल सेवेवर परिणाम हेाणार आहे. मेगा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे १६ मेल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, दादर-जालना-दादर जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर यासह इतर गाड्यांचा समावेश आहे.

सीएसएमटी दादर कुर्ला ते डोंबिवलीपर्यंत लोकलसेवा सुरळीत राहणार आहे तसेच कर्जत कसारा ते कल्याण मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत पनवेल दिवामार्गे धावतील त्या पाच तास डोंबिवलीपुढे गाडयाच नाही दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी आवश्यकता असेल तरच रेल्वेने प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऐन नाताळाच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

First Published on: December 25, 2019 7:01 AM
Exit mobile version