राजधानी एक्स्प्रेसला झेंडा दाखवण्यासाठी चढाओढ

राजधानी एक्स्प्रेसला झेंडा दाखवण्यासाठी चढाओढ

Kalyan Junction

राजधानी एक्स्प्रेसला कल्याण जंक्शनला थांबा मिळाला असून, या गाडीला झेंडा दाखवण्यासाठी शिवसेना भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची गर्दी उसळली होती. त्यामुळे कल्याणात शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पहावयास मिळाली. मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू झाली. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कल्याणमध्ये दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास दाखल झाली.

कल्याणमध्ये राजधानी एक्स्प्रेस पोहोचण्याच्या आधी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर कल्याणच्या उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, महापालिकेतील गटनेते वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, परिवहन समितीचे सदस्य कल्पेश जोशी यांनीही स्टेशनवर एकच गर्दी केली. कल्याण स्टेशनला राजधानी एक्स्प्रेस थांब्याचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. इतकेच नव्हे तर एक्स्प्रेसच्या इंजिनवर चढत घोषणाबाजी केली. मात्र शिवसेना व भाजपा कार्यकत्यांच्या घोषणाबाजीने प्रवासी हैराण झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे या निमित्ताने पाहावयास मिळाले.

कल्याण-ते दिल्ली सुसाट                                                                                            कल्याणहून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी किमान २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक गाड्यांना तब्बल ३० तासांहून अधिक वेळ जातो. त्यातून प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी अनेक प्रवासी मुंबई सेंट्रलहून दिल्लीला जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसने प्रवास करतात. त्यांना कल्याणहून पोचण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमार्गावरही राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. या गाडीने कल्याणहून दिल्लीत अवघ्या १८ तास ४२ मिनिटांत पोचता येईल. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोनमेंट थांबे देण्यात आले आहेत. दर बुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी राजधानी एक्स्प्रेस सुटणार आहे. ती दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी कल्याणमध्ये पोहचेल. तर दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी गाडी दिल्लीत पोहोचणार आहे.

First Published on: January 20, 2019 5:48 AM
Exit mobile version