वृद्ध मुस्लीम दाम्पत्याला फसवण्यासाठी अतिरेकी असल्याचा ठेवला ठपका!

वृद्ध मुस्लीम दाम्पत्याला फसवण्यासाठी अतिरेकी असल्याचा ठेवला ठपका!

कल्याणमध्ये राहाणाऱ्या एका मुस्लीम दाम्पत्याला फसवण्यासाठी दोन भामट्यांनी त्यांच्या धर्मावरून त्यांना हेटाळत त्यांच्यावर थेट काश्मिरी अतिरेकी असल्याचाच ठपका ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी यातल्या एका भामट्याला अटक केली असून दुसरा अजूनही फरार आहे. अक्रम कुरेशी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, दुसऱ्याचा पोलीस शोध सुरु आहे. या दोघांच्या धमकीला घाबरून सहन करणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने अखेर त्याबाबत पोलसांत तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. हे दोघेही या पीडित दाम्पत्याला पैशांसाठी त्रास देत असल्याचंही समोर आलं आहे.

भामट्याला अटक

कसं फसवलं या भामट्यांनी?

कार खरेदीसाठी घेतलेले ४ लाख रुपये परत न करण्यासाठी या दोघा भामट्यांनी पीडित दाम्पत्याला काश्मिरी अतिरेकी ठरवण्याची धमकी देण्याचा डाव आखला. त्यासाठी त्यांना दोन बनावट पोलिसांसमोर या दाम्पत्याला उभे करून जेलमध्ये टाकण्याची धमकीही दिली. मात्र त्यांचा हा डाव त्याच्याच अंगाशी आला. कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात परवीन सय्यद या पती झुबेर यांच्यासोबत राहत आहेत. परवीनचे पती दहा वर्षांपासून परदेशात काम करायचे. मात्र, पती नोकरी सोडून घरी परतल्यानंतर त्यांनी उपजीविकेसाठी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ५ मुलांची उपजीविका चालवण्यासाठी परवीनने कार खरेदी करून ती ओला कंपनीत लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परवीनने त्या परिसरात राहणारे अकरम कुरेशी आणि त्याचा मित्र आदेश सिंग यांना कार खरेदी करण्यासाठी सांगितले. त्यावेळी दोघांनी त्यासाठी परवीनकडून ४ लाख रुपये घेतले. मात्र अनेक दिवसांनंतरही कार खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे परवीनने त्यांच्याकडून आपले पैसे परत मागितले. मात्र त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.


हेही वाचा – सेहवागच्या पत्नीची बिझनेस पार्टनरकडून फसवणूक

अखेर हिंमत करून त्यांनी तक्रार केली!

हे मुस्लीम दाम्पत्य असल्याने अनेक वर्ष परदेशात राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा काश्मिरी पोशाख आहे. हीच संधी साधत या दोघांनी त्यांच्यावर काश्मिरी अतिरेकी असल्याचा ठपका ठेवीत पैसे हडपण्याची शक्कल लढवली. अक्रमने परवीनचे पती झुबेर यांना ठाण्याला घेऊन गेला. एका ऑफिसमध्ये दोन बोगस पोलिसांसमोर झुबेरवर काश्मिरी अतिरेकी असल्याचे आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. यानंतर परवीन आणि झुबेर जेव्हा कधी पैसे मागायचे त्यावेळी अक्रम आणि आदेश या दाम्पत्याला अतिरेकीचा ठपका ठेवत पैसे देण्यास नकार देत होते. अखेर कंटाळलेल्या दाम्पत्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर या दोघा भामट्यांचे बिग फुटले. पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेत आहेत.

First Published on: July 13, 2019 5:53 PM
Exit mobile version